वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या प्रिमियर लीग तिरंदाजी स्पर्धेच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्पर्धा आयोजकांनी तिरंदाजी प्रिमियर लीग हंगामाचा कार्यक्रम निश्चित केला असून सदर स्पर्धा 2 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
भारतामध्ये तिरंदाजी प्रिमियर लीग स्पर्धा प्रथमच खेळवली जात असून यामध्ये सहा फ्राँचायझीचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये सहा संघांचा समावेश असून ही स्पर्धा दुहेरी राऊंड रॉबिन टप्प्यात 2 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान होणार असून 12 ऑक्टोंबरला उपात्यं आणि अंतिम फेरीचे सामने होतील.
राऊंड रॉबिन-1 2 ते 6 ऑक्टोंबर दरम्यान होणार असून या स्पर्धेत पृथ्वीराज योद्धास (दिल्ली), मायटी मराठाज (महाराष्ट्र), काकतीया नाईट्स (तेलंगणा), राजपुताना रॉयल्स (राजस्थान), चेरो आर्चर्स (झारखंड) आणि चोला चेफ्स (तामिळनाडू) हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राऊंड रॉबिन-1 मध्ये हे संघ दुसऱ्या संघांबरोबर सामने खेळतील.
राऊंड रॉबिन-2 टप्पा 7 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे. या टप्प्यात प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर अधिक सामने खेळणार आहे. बाद फेरीचा टप्पा 12 ऑक्टोंबरला संपणार आहे. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने खेळविले जात असून पहिल्या प्रिमियर लीग तिरंदाजी स्पर्धेचा चॅम्पियन ठरणार आहे. सदर स्पर्धा नवी दिल्लीतील यमुना क्रीडा संकुलात होणार आहे. सदर स्पर्धेमध्ये जागतिक दर्जाचे तिरंदाजपटू दीपिका कुमारी, ज्योती सुरेखा व्हेनाम तसेच विदेशी तिरंदाजपटू मिकी स्कोलेसर, अँड्री बिकेरा, ऑलम्पियन तिरंदाजपटू ब्रॅडी इलिसन आणि अॅलेझेंड्रा व्हॅलेंसिया यांचा सहभाग राहणार आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन 2 ऑक्टोंबरला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केले जाणार आहे.









