‘रामायण’चे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र
► वृत्तसंस्था/ मुंबई
‘रामायण’चे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे रविवारी वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. वृद्धापकाळाशी संबंधित अनेक आजारांशी झुंज सुरू असतानाच रविवार, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘रामायण’चे ‘लक्ष्मण’ सुनील लाहिरी यांनी प्रेम सागर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रेम सागर यांचा फोटो शेअर करत दु:खद बातमी शेअर करताना आपल्याला खूप वाईट वाटत असल्याचे स्पष्ट केले. ‘रामानंद सागरजी यांचे पुत्र प्रेम सागरजी यांचे निधन झाले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. या संकटात कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती देवो’, असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर हे व्यवसायाने चित्रपट निर्माते आणि छायाचित्रकार होते. त्यांनी 1968 मध्ये एफटीआयआयमधून पदवी प्राप्त केली होती. त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘चरस’ आणि ‘ललकार’सारखे चित्रपट बनवले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही शो देखील बनवले आहेत. ‘विक्रम और वेताळ’ या शोचे दिग्दर्शन आणि निर्मिती प्रेम सागर यांनी केले होते. रामानंद सागर फाउंडेशनमध्ये ते प्रामुख्याने सहभागी होते.









