पोषण आहाराची रक्कम लाटण्याचे प्रयत्न
बेळगाव :डिजिटल अरेस्टच्या प्रकारानंतर सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना आपले लक्ष्य बनविले आहे. पोषण अभियान अंतर्गत नावे नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्याचा सपाटाच गुन्हेगारांनी सुरू केला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या आठवड्याभरात बेळगाव शहर व उपनगरात आठहून अधिक गर्भवती महिलांच्या बँक खात्यातून रक्कम लाटण्यात आली आहे. फसवणुकीच्या या नव्या प्रकाराने तपास यंत्रणांचीही डोकेदुखी वाढली असून पोषण अभियानांतर्गत सरकारी मदत मिळेल, या आशेने बसलेल्या गर्भवती महिलांची लुबाडणूक केली जात आहे.
राज्य सरकारच्या पोषण अभियान अंतर्गत गर्भवती महिलांच्या बँक खात्यात 7 हजार 500 रुपये जमा केले जातात. त्यांची यादी वेगवेगळ्या गावातील, गल्ल्यांमधील अंगणवाडी कार्यकर्त्यांकडे असते. या यादीतील गर्भवती महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. सुमारे आठहून अधिक महिला तक्रार देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी शहर सीईएन पोलीस स्थानकात पोहोचल्या होत्या. पोषण अभियान योजनेच्या लाभार्थी महिलांना कॉल येतो. तुमच्या बँक खात्यात 7 हजार 500 रुपये जमा होणार आहेत. त्याआधी तुमच्या व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली जाईल, त्यावर क्लिक करा आणि ओटीपी कळवा, लगेच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले जात आहे. त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून ओटीपी पाठवताच बँक खात्यातील रक्कम गायब केली जात आहे.
गुन्हेगारांनी पाठवलेल्या लिंकवर महिलांनी क्लिक करू नये
यासंबंधी शहर सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्याशी संपर्क साधला असता असे प्रकार सुरू आहेत, ही गोष्ट खरी आहे. सायबर गुन्हेगारांना गर्भवती महिलांची यादी कुठून मिळाली, याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, महिलांनी गुन्हेगारांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये, त्यांना ओटीपीही कळवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर