गँगवाडीत दोन कुटुंबात मारामारी : चौघांना अटक
बेळगाव : आपले आईवडील व भावाबरोबर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेवर स्टम्पने हल्ला करण्यात आला आहे. गँगवाडी येथे ही घटना घडली असून माळमारुती पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघा जणांना अटक केली आहे.कविता आशिष कदम (वय 24) राहणार कंग्राळी खुर्द असे जखमी महिलेचे नाव आहे. पती आशिष सुनील कदम, राहणार कंग्राळी खुर्द, वडील लक्ष्मण गोपाल चौगुले, आई रेश्मा, भाऊ मंथन हेही जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. कविता व आशिष हे दांपत्य कंग्राळी खुर्दला राहते. गँगवाडीत तिचे माहेर आहे.
वैद्यकीय तपासणी व सोनोग्राफीसाठी कविता गँगवाडी येथील आपल्या माहेरी आली होती. त्याचवेळी महेश बाळू सकट, बाळू दत्ता सकट, ओंकार बाळू सकट, शीतल बाळू सकट सर्व राहणार गँगवाडी हे कविताचे आईवडील व भावाबरोबर भांडत होते. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कविताचा पती आशिषलाही मारहाण करण्यात आली. त्यावेळी पती व कुटुंबीयांबरोबर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी ती स्वत: पुढे गेली. त्यावेळी स्टम्पने तिच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी एकाच कुटुंबातील चौघा जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.









