खजूर-खारीक मागणीत वाढ; दर अधिक : गोवा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील ग्राहकांकडूनही खरेदी
बेळगाव : पवित्र रमजान महिना सुरू झाल्याने बाजारात सुका मेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. विशेषत: खजूर, खारीक, पिस्ता, अक्रोड, बदाम, काजू यांना पसंती दिली जात आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे खजुराची आवक कमी झाली होती. मात्र, यंदा सुक्या मेव्याची मागणी वाढली आहे. बाजारात बेळगावसह गोवा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील ग्राहकांकडूनही खरेदी वाढू लागली आहे. विशेषत: ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खजूर आणि इतर सुका मेवा दाखल झाला आहे. खडेबाजार परिसरात सायंकाळच्या वेळेत सुका मेवा खरेदीसाठी वर्दळ वाढू लागली आहे. सुक्री, कियान, आजवा, कलमी जातीच्या खजुरांना अधिक मागणी आहे. गतवर्षी खजुराचा दर प्रतिकिलो 160 ते 1200 रुपयांपर्यंत होता. यंदा तो 200 ते 1600 रुपयांपर्यंत गेला आहे. गतवर्षी खारीकचा दर प्रतिकिलो 240 रुपये होता. यंदा तो 480 रुपयांपर्यंत गेला आहे. खारीक, खजूर आणि इतर सुका मेवा पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. रमजान महिन्यात इफ्तारला खजूर खाऊन रोजा सोडला जातो. त्यामुळे खजूर, खारीक आणि सुक्या मेव्याला मागणी आहे. विशेषत: अरब देशांतून येणाऱ्या खजुरांना पसंती दिली जात आहे. मात्र इराण, अरेबिया येथून येणाऱ्या खजुराच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
धार्मिक पार्श्वभूमी
खजूर हे आरोग्यासाठी उत्तम आणि औषधी गुणधर्म असलेले म्हणून ओळखले जातात. याला धार्मिक पार्श्वभूमी असून इस्लामचे महंमद पैगंबर यांनी इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन रोजा सोडला. त्यामुळे मुस्लीम बांधवांकडून रमजान महिन्यात उपवासासाठी दररोज खजूर आणि खारीक यांना पसंती दिली जाते.
सर्वधर्मियांकडून खरेदी
रमजानचा शेवटचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसे खजूर आणि सुक्या मेव्यांची खरेदी वाढू लागली आहे. केवळ मुस्लीम बांधवच नाही तर सर्व धर्माचे लोक आमच्याकडून सुका मेवा खरेदी करू लागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत मागणी वाढली आहे. त्यामुळे उलाढाल वाढू लागली आहे.
– मुदस्सर मुजावर (व्यापारी)









