श्रींचा पालखी सोहळा नानासो पाटील यांच्या घरी विसाव्यास आला
वाशी : महाराष्ट्रात नद्या जोड प्रकल्प येऊन हरितक्रांतीने सर्वत्र नंदनवन होईल, दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने गावोगावी इर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल, मनुष्याला आठरा तऱ्हेचा आजार होईल, डॉक्टर लोक हात टेकतील, गरिबांचे जगणे मुश्किल होईल, आरक्षणाच्या तिढ्यांमुळे जातीपातीचे वैरत्व पेट घेईल, अशी भाकणूक भगवान पुजारी व भागोजी राणगे यांनी शिवेवरील बिरदेव मंदिरात कथन केली.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत राज्यातील यंदाची पहिली भाकणूक संपन्न होऊन वाशीत नवरात्र सोहळ्यास मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. श्रींचा पालखी सोहळा प्रमुख मानकरी, धनगर समाज बांधव, भाविक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत भाणूस व मुख्य मंदिरातून शिवेवरील बिरदेव मंदिरात गेला. यावेळी ढोल, कैताळांचा निनाद, बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.
दरम्यान, काशिनाथ बनकर, गुंडा अवघडे यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम खेळले. देवस्थानचे देवऋषी भगवान पुजारी व भागोजी रानगे यांनी बिरदेव रुपी साक्षीने भाकणूक केली. यानंतर श्रींचा पालखी सोहळा नानासो पाटील यांच्या घरी विसाव्यास आला. जय शिवराय तालीम मंडळ पाटील गल्ली, शिवतेज तरुण मंडळ यांचे वतीने फुलांच्या पायघड्या घालून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान आकर्षक आतषबाजी झाली. यावेळी करवीर पोलीस ठाण्याकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मानकरी उदयानीदेवी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, दिनकर पाटील, देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे, सचिव धनाजी रानगे, दत्तात्रय पुजारी, आनंदा पुजारी, यशवंत रानगे, विलास काटकर, कृष्णात लांडगे, सूर्याप्पा हजारे, सचिन तिबिले, विठ्ठल जरग यांच्यासह देवालय ट्रस्टीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.








