विसर्जन मिरवणूक मार्गावरील दोन ट्रक दगड उचलले : जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण
बेळगाव : यंदाची श्री विसर्जन मिरवणूक व्यवस्थित व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. विशेष करून पोलीस व महापालिकेने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील बेळगावात तळ ठोकून आहेत. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या दृष्टिकोनातून विसर्जन मार्गासह संवेदनशील व अतिसंवेदनशील परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले दगड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गोळा केले जात आहेत. दोन दिवसात दोन ट्रक दगड गोळा करण्यात आले आहेत. पुणे, मुंबईच्या धर्तीवर बेळगावात गणेशोत्सव साजरा केला जातो. अकरा दिवस पूजाअर्चा केल्यानंतर सार्वजनिक श्री मूर्तींचे जल्लोषात विसर्जन केले जाते.
शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांकडून विशेष करून कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावात श्री मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनंतचतुर्दशीदिवशी रात्री विसर्जन मिरवणूक सुरू होते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ही विसर्जन मिरवणूक सुरूच असते. दरम्यानच्या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेकडून यापूर्वीच सर्व विसर्जन तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यासह त्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या श्री मूर्तींचे विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा गणेशोत्सव सुरू होण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी बेळगावात
बंदोबस्ताच्या निमित्ताने वरिष्ठ पोलीस अधिकारीही बेळगावात दाखल झाले आहेत. मिरवणुकीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, शांततेत मिरवणूक पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून विसर्जन मार्गासह शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागातील रस्त्याच्या कडेला असलेले दगड गोळा केले जात आहेत. दोन दिवसात दोन ट्रक दगड गोळा करण्यात आले आहेत. दगड गोळा करण्यासह एलअँडटीकडून जलवाहिनी घालण्यासाठी खोदलेल्या चरीवर टाकण्यात आलेले दगडही उचलले जात आहेत. त्यावर आता चिपिंग टाकून रोलर फिरविला जात आहे. एकंदरीत रस्त्याच्या कडेला कोठेही दगड सापडू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.









