बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाची रविवारी बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहून आपल्या सूचना मांडल्या. महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव म्हणाले, बेळगाव स्मार्ट सिटीची कामे शहरात सुरू आहेत. यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे गणेशोत्सवाला मोठी अडचण निर्माण होणार आहे. यादृष्टीने महापालिकेला निवेदन देऊन उत्सवाच्या आत सर्व खड्डे बुजविण्याचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच विद्युत वाहिन्यांसंबंधीही हेस्कॉम विभाग, उत्सवकाळात प्रशासनाकडून सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनाही निवेदन देण्यात येणार आहे. तसेच ज्या गणेश मंडळांच्या समस्या आहेत, त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिरवणुकीवेळी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
ते म्हणाले, ठिकठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम एलअॅण्डटीकडून सुरू आहे. यासाठी महापालिका अभियंत्यांना बोलावून शहापूर विभागात सर्व्हे करून खड्डे गणेशोत्सवाच्या आत बुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मिरवणूक काळात विद्युत वाहिन्यांची तर समस्या असतेच शिवाय केबल वाहिन्यांचाही अडथळा निर्माण होतो. सदर समस्याही सोडविण्यात येईल. तसेच मिरवणुकीवेळी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी रमेश सोनटक्की, अशोक चिंडक, संजू शिंदे, विजय भोसले यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.









