सकाळी दक्षिण तर दुपारनंतर उत्तर भागात रिपरिप : दुपारनंतर पावसामुळे बाजारात शुकशुकाट
बेळगाव : शहरात एकीकडे ऊन आणि दुसरीकडे पावसाची रिमझिम असे दृष्य रविवारी बेळगावकरांना पाहायला मिळाले. शहराच्या दक्षिण भागात दुपारी 1 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू होती. तर उत्तर भागात मात्र कडकडीत ऊन पडले होते. वडगाव, शहापूर, अनगोळ व ग्रामीण भागात पावसाची रिपरिप सुरू असल्याने सखल भागात पाणी साचले. मागील चार दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. शनिवारी दुपारी शहराच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी 1 नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काही भागात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे पाणी साचले होते. शहराच्या दक्षिण भागात दुपारी पाऊस सुरू असताना उत्तर भागात मात्र कडकडीत ऊन होते.
दुपारी 4 नंतर कॅम्पसह शहराच्या उत्तर भागातही पाऊस दाखल झाला. लग्न सराईचे दिवस असल्याने खरेदीसाठी रविवारी बाजारात मोठी गर्दी झाली होती. गोव्यासह स्थानिक नागरिक खरेदीसाठी बेळगावात आले होते. परंतु दुपारनंतर झालेल्या पावसामुळे बाजारात शुकशुकाट जाणवला. साहित्याची आवराआवर करताना रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. रविवारी शहराच्या अनेक भागात वीजपुरवठा ठप्प होता. ग्रामीण भागातही सकाळी 10 वाजल्यापासून दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. पावसाची रिपरिप आणि त्यात दिवसभर वीजपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे दिसून आले.









