कणकुंबी परिसरात सर्वाधिक पाऊस : मे महिन्यातच नदी-नाले प्रवाहित : पहिल्यांदाच मे महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने हवामानात बदल
खानापूर : खानापूर तालुका अती पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जून महिन्याच्या मध्यापासून दमदार पाऊस सुरू होतो. त्यानंतर तालुक्यातील नदी-नाले प्रवाहित होऊन तुडुंब भरून वाहू लागतात. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून तालुक्यात पश्चिम भागासह सर्वत्रच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात नदी, नाले वाहू लागले आहेत. मलप्रभा नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. होत असलेल्या पावसामुळे भात पेरणी पूर्णपणे लांबली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे तसेच पेरणीला पूर्णपणे ब्रेक लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिल्याने आणि पावसाचे वातावरण कायम राहिल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. तसेच माळ आणि काटे जमिनीत ओल मोठ्या प्रमाणात असल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे आणि पाणथळ जमिनीतील पेरण्या लांबल्या आहेत. हवामान खात्याने हा पाऊस जूनच्या 3 पर्यंत राहणार असल्याचे जाहीर केले असून मान्सूनही सक्रिय झाल्याने यावर्षी वेळेत दाखल हेत आहे. त्यामुळे तालुक्यातील भात पेरणी होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. तालुक्यात 31 हजार हेक्टरवर भातपीक घेण्यात येते. त्यातील जवळपास 20 हजार हेक्टरवर पेरणी करून भातपीक घेतले जाते. मात्र यावर्षी मे महिन्यातच पावसाने जोरदारपणे तडाखा दिल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याने पाणथळ आणि माळजमीन आणि काटे जमिनीतही पाणीच पाणी झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
तसेच पाणथळ जमिनीत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भातपेरणी केली जाते. मात्र पाणी साचून राहिल्याने पेरणी लांबली आहे. पेरणीसाठी पाऊस पुढील किमान पंधरा दिवस पूर्णपणे थांबणे गरजेचे आहे. मात्र वातावरणातील बदल पाहता आणि हवामान खात्याने जाहीर केलेला पावसाचा अंदाज त्यामुळे पुढील पंधरा दिवस सातत्याने पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी जर खरोखरच पाऊस लांबला तर भात पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. नट्टी लावून भातपीक घेण्यासाठीही पाऊस थांबणे गरजेचे आहे. नट्टी लावण्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यामुळे एकाचवेळी हंगाम आल्यास शेतकऱ्यांची धांदल उडणार आहे. यावर्षी भातपेरणी आणि नट्टी लावणे लांबणार असल्याने सुगीच्या वेळी भात पिकाला पोषक असणारा पाऊस आणि वातावरण राहील की नाही, या विचारात शेतकरी सापडला असल्याने शेतकऱ्यांसमोर आताच अस्मानी संकट उभारले आहे.
रस्ता दुरुस्ती-डागडुजी कामही रेंगाळले
तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. तालुक्यातील अनेक संपर्क रस्ते खड्डेमय बनल्याने ग्रामीण भागातील दळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून धोकादायक बनली आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांच्या डागडुजीची आणि दुरुस्तीची कामे होणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाकडून रस्त्यांच्याबाबत पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. तर काही संपर्क रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांची कामे ठप्प झाली असून आता पावसाळ्यानंतरच ही कामे सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या खड्ड्यातूनच पुढील सात-आठ महिने प्रवास करावा लागणार आहे. हे आता स्पष्ट झाले आहे.









