पेरणीपूर्व मशागती-भातपेरण्या खोळंबल्या
खानापूर : मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी दुपारी 3 वाजता खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे तसेच काही ठिकाणी भातपेरण्या सुरू असलेल्या भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने वातावरणात मात्र कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली होती. मंगळवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. आणि वातावरणात कमालीची उष्णता वाढलेली होती.
दुपारी 3 नंतर ढगांचा गडगडाट होऊन वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस तालुक्याच्या सर्वच भागात झाला आहे. पूर्व आणि पश्चिम भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे. पाणथळ जमिनीतील पेरणी सुरू होती. तसेच माळरानावरील आणि काटे जमिनीतील पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू होती. मात्र मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पुढील चार दिवस पेरणी आणि मशागतीची कामे खोळंबलेली आहेत. तालुक्यात पाणथळ जमिनीत भातपीक घेण्यात येते. याची पेरणी जूनच्या पूर्वीच करण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणथळ जमिनीत पेरणीची कामे हाती घेतली आहेत. होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पेरणीच्या कामात मात्र व्यत्यय आला आहे.
गुंजी परिसरात दमदार : शेतकरी सुखावला : पावसाने नाल्यांना पाणी
मंगळवारी दुपारी गुंजीसह परिसरात दमदार पावसाने झोडपले असून शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोसाट्याच्या वारा आणि विजेच्या कडकडाटासह दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. जवळजवळ दीड तास या भागात दमदार पाऊस कोसळल्याने येथील नाल्यांना देखील पाणी आले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मात्र या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून या भागात वेळोवेळी पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे पेरणी हंगाम तोंडावर आल्याने पेरणीपूर्व कामे कशी करावी, या विवंचनेत येथील शेतकरी चिंतातुर होऊन पावसाच्या प्रतीक्षेत होता. कारण या भागातील बहुतांश शेतकरी हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भातपेरणी करतात. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत करणे गरजेचे आहे. त्यासाठी पावसाची अत्यंत गरज होती. अखेर मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
गटारी तुडुंब भरल्याने घरात शिरले पाणी
मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे गुंजीतील सागर घाडी यांच्या घरात गटार सुविधेअभावी पावसाचे पाणी भरल्याने कुटुंबीयातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर घरामध्ये पाठीमागील बाजूने पावसाचे पाणी शिरून तीन खोल्या पाण्याने भरल्या. त्यामुळे जीवनोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. अनेकवेळा ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्यांसह ग्रामसभेमध्येही हा मुद्दा उपस्थित करून गुंजी ग्रामपंचायत या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रा.पं.च्या कार्यपद्धतीवर सखेद संताप केला जात आहे. याविषयी ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती गुरव यांच्याशी संपर्क साधला असता सदर बाजूने ग्रामपंचायतच्यावतीने गटार खोदाई करून बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. मात्र सदर ठिकाणी गटारी बांधण्यासाठी अनेक तक्रारी झाल्याने सदर निधी लॅप्स झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपापसातील तक्रारी मिटवून त्या ठिकाणी गटार बांधण्यासाठी मी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









