कोल्हापूर / कृष्णात चौगले :
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिह्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे उन्हाळी हंगामातील भात, भुईमूग, सुर्यफूल, मका आदी पिक काढणी पूर्णपणे खोळंबली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे खरीप पेरणीसाठी आवश्यक पुर्वमशागतीची कामे ठप्प झाली आहेत. गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. पूर्वमशागत करायची झाल्यास पुढील आठ ते दहा दिवस पावसाची उघडीप आवश्यक आहे. त्यामुळे ‘मोसमीपूर्व’ला ब्रेक कधी लागणार याकडे बळीराजाचे लक्ष आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यातील बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुढील आठवड्यात अरबी समुद्रात वादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज आहे. सध्या मोसमी पावसाच्या वाटचालीला अनुकूल परिस्थिती असून येत्या चार दिवसांत केरळांत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7 ते दहा दिवसांत मोसमी पावसाचे दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमन होईल. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस थांबला तरी पुन्हा मोसमी पाऊस सुरु होणार आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी पूर्व मशागत कधी करायची आणि पेरणी कधी उरकायची ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान पावसामुळे झालेल्या उन्हाळी पिकांच्या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
- साधता येणार नाही ‘रोहिणीचा पेरा
जिह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 3.91 लाख हेक्टर आहे. यामध्ये भात, ज्वारी, नागली, सोयाबिन, भुईमुग, इतर कडधान्ये व भाजीपाल्यांचा समावेश होतो. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच खरीप हंगामातील पेरणीची तयारी केली जाते. दरवर्षी शेतकऱ्यांकडून रोहिणीचा पेरा साधण्यासाठी प्रयत्न केले जातात. या नक्षत्रावर पेरणी केल्यानंतर पिकाची चांगली उगवण होऊन वाढ होते अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. पण या खरीप हंगामात शेतकऱ्यांना ‘रोहिणी’चा पेरा साधता येणार नाही.
- शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. वेधशाळेच्या अंदाजानुसार यंदा पाऊस वेळेत सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून कृषि विभागानेही बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. पण मान्सूनपूर्व पावसामुळे अद्याप पूर्वमशागतीची कामेच ठप्प असल्यामुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले आहे.
- खरीप हंगामातील सर्वसाधारण पेर क्षेत्र
पिक सर्वसाधारण पेर क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भात 90640
नागली 16308
कडधान्ये 7507
भूईमुग 28530
सोयाबिन 41445
इतर पिके 1700
ऊस 198604
- लाखो रूपयांचे नुकसान
12 ते 18 मे दरम्यान झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामध्ये सुमारे 12 लाख 26 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. यामध्ये त्यानंतर झालेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचा समावेश नाही. त्या कालावधीतील नुकसानीची आकडेवारी कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. घरांवर झाड पडले, पत्रे उडाले, दोन जनावरे वीज पडून मयत,घरांची पडझड, जनावरांच्या गोठ्याचे नुकसान, चार चाकी वाहनावर झाड पडले, विजेच्या आवाजाने म्हशीचा मृत्यू, घरामध्ये पावसाचे पाणी जावून नुकसान, केळी पिकाचे नुकसान आदी अनेक कारणांमुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
- अवकाळी पावासामुळे झालेले नुकसान (तालुकानिहाय)
तालुका अंदाजीत नुकसान (12 ते 18 मे अखेर)
करवीर 50 हजार
कागल 9 लाख 66 हजार
शाहूवाडी 1 लाख
चंदगड 60 हजार
गडहिंग्लज 50 हजार
एकूण 12 लाख 26 हजार








