पीडीओ, अधिकाऱ्यांना करण्यात आल्या सूचना
बेळगाव : राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्याने आता गँरंटी योजना लागू करण्यास प्रारंभ झाला आहे. सरकारने पाच महत्त्वाकांक्षी योजना देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. त्या अनुषंगाने काँग्रेस सरकारने आता गृहलक्ष्मी योजनाही लवकरच नागरिकांच्या सेवेत देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात तालुका पंचायत सभागृहात पूर्वबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकार दि. 30 ऑगस्ट रोजी म्हैसूर येथून या योजनेचे उद्घाटन करणार आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील जनतेलाही याचा लाभ मिळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर होते. व्यासपीठावर तालुका पंचायत सहाय्यक सचिव राजेश मोरबद, गणेश कलाले आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतींवर एलईडी टी. व्ही लावाव्यात
राजेश दनवाडकर यांनी सर्वच ग्राम पंचायतींवर एलईडी टि.व्ही. लावाव्यात. राज्यभरात एकाचवेळी हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या. कार्यक्रमानिमित्त रांगोळी व इतर सांस्कृतिक स्पर्धा घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पाच गँरंटी योजनेतील सध्या दोन योजना राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. याचबरोबर आता तिसरी गँरंटी योजना देण्यासाठी प्रयत्न सुरू पेले आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून याबाबत जागृती करण्यास सुरुवात केली आहे. तालुका पंचायतमध्येही याबाबत बैठक घेवून संबंधित पीडीओ, ग्राम पंचायत सेक्रेटरी व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्यात आली. या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









