तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात पांडव कसे सर्व प्रसंगात भगवान श्रीकृष्णाची आठवण करीत होते याबद्दल सांगताना म्हणतात, पहा ते पांडव अखंड वनवासी । परी त्या देवासी आठविती ।। सर्व दु:खामध्ये पांडवांनी श्रीकृष्णांचा विसर पडू दिला नाही तशीच भावना आपल्यामध्ये यावी यासाठी तेही प्रार्थना करीत आहेत. तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दु:खाचे डोंगर झाले तरी ।। सर्व प्रसंगांमध्ये पांडवांची आई कुंतीने हरिभक्त कसा श्रीकृष्णावर अवलंबून असतो ह्याचे उदाहरण सर्व जगासमोर ठेवले आहे. कुंती ही श्रीकृष्णांची आत्या होती. भगवान श्रीकृष्ण कुंतीचे भाऊ वसुदेव यांच्या पुत्ररूपात अवतरित झाले होते. त्यांच्यातील हा नातेसंबंध औपचारिक असूनही, भगवंताचे उदात्त आणि पवित्र स्वरूप ती पूर्णपणे जाणून होती. तिने संपूर्णपणे ओळखले होते की, जगाला आसुरी सत्तेपासून मुक्त करून सदाचाराची पुनर्स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक जगातून, स्वधामातून पृथ्वीवर श्रीकृष्ण अवतरित झाले आहेत.
महाभारतातील युद्धाअगोदर मत्सराने पेटलेल्या दुर्योधनाने पांडवांविरुद्ध अनेक कटकारस्थाने केली. पुत्रप्रेमाने आणि डोळ्याने आंधळा असलेल्या धृतराष्ट्राने नाईलाजास्तव संमती दिल्यामुळे त्याने पांडवांना कित्येकदा नाना तऱ्हेने त्रास देण्यास सुरुवात केली. जीवे मारण्याचाही पुष्कळ प्रयत्न केला. लाक्षागृहामध्ये पांडवांना जिवंत जाळून ठार मारण्याची योजनाही त्याने आखली होती. यावेळी पांडवांबरोबर त्यांची आई कुंतीही दुर्योधनाच्या दुष्ट कृत्यामुळे झालेला त्रास सहन करीत होती. शेवटी चाणाक्ष दुर्योधनाने कपटी शकुनीच्या साहाय्याने पांडवांना द्यूतक्रीडेमध्ये फसवून त्यांना राज्यातून हद्दपार केले, त्यांचे स्वातंत्र्यही हिरावून घेतले, द्यूतक्रीडेमध्ये हरल्यामुळे पांडवांची पत्नी द्रौपदीला कौरवांनी अत्यंत घृणास्पदरित्या वागविले. पांडवांना बळजबरीने हद्दपार करून तेरा वर्षे वनवासात पाठविले, कुंतीला याचे अतोनात दु:ख झाले. वनवास संपल्यानंतर राज्य मिळविण्यासाठी पांडव हस्तिनापुरात आले, परंतु दुर्योधनाने आडमुठेपणाने राज्य परत करण्यास नकार दिला एवढेच नाही तर पांडवकुळाचा संपूर्ण नाश करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. स्वयं श्रीकृष्णाच्या शांतीपूर्ण वाटाघाटीचा प्रयत्नही दुर्योधनाने स्वीकारला नाही. परिणामी कुरुक्षेत्रावरील ऐतिहासिक भूमीवर भयंकर विनाशकारी रणसंग्राम तब्बल अठरा दिवस चालला. अंती कोट्यावधी योध्यांपैकी काही मोजके वगळता इतर सर्व मृत्युमुखी पडले. केवळ भगवान श्रीकृष्ण, पांडव आणि इतर काहीजणच या विध्वंसातून बचावले. दुर्योधनासहित कौरव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
या सर्व संकटातून परित्राणाय साधूनाम हे वचन सार्थ करीत सर्व संकटातून पांडवांना मुक्त करून आपल्या योजना संपन्न झालेल्या पाहून भगवान श्रीकृष्ण आपल्या निजधामाला परतण्याची तयारी करीत होते. दुर्योधनाने महाराणी कुंतीच्या परिवाराला कित्येक वर्षे अतोनात त्रास दिला होता, त्याकाळात श्रीकृष्णांनी वेळोवेळी त्यांचे रक्षण केले होते. आता श्रीकृष्ण त्यांच्यापासून दूर निघाले होते. याप्रसंगी सर्व आठवणींनी कुंती महाराणीला अतिशय गहिवरून आले होते. ती भगवान श्रीकृष्णांच्या रथाजवळ गेली आणि तिने काकुळतीने, अंत:करणापासून श्रीकृष्णांची प्रार्थना सुरू केली.
कुंतीच्या ह्या प्रार्थना भक्ताच्या हृदयातून प्रगट झालेल्या साध्या, सरळ भाषेमधील भावना आहेत. अतिशय गहन तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रीय कुशाग्र बुद्धी, आध्यात्मिक अनुभव, स्तुती करणारे तिचे बोलणे वाचकांना भगवद्प्रेमाचा सखोल अनुभव घेण्यास प्रवृत्त करतात. कुंतीने भगवान श्रीकृष्णाबद्दल गायिलेले उत्स्फूर्त गौरव आणि आध्यात्मिक मार्गाचे वर्णन हे महाभारतात आणि श्रीमद भागवतमध्ये अजरामर झाले आहे. त्याचे वाचन, श्र्रवण आणि गायन हजारो वर्षांपासून ऋषी, तत्त्वज्ञानी करीत आले आहेत. श्रीकृष्ण हे भगवंत आहेत ह्याचे पूर्ण ज्ञान कुंतीला आहे. ह्या प्रार्थनांमध्ये भगवान श्रीकृष्ण कशासाठी अवतरित होतात ह्याचेही वर्णन आहे. श्रीमद् भागवतमधील पहिल्या खंडातील आठव्या अध्याय अंतर्गत ह्या प्रार्थना आहेत.
कुन्त्युवाच-नमस्ये पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृते: परम् । अलक्ष्यं सर्वभूतानामन्तर्बहिरवस्थितम् ।
अर्थात, ‘श्रीमती कुंती म्हणाली, हे कृष्णा, मी आपल्याला नमस्कार करते, कारण आपण आद्य पुरुष असून, प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित होत नाही. आपण प्रत्येक गोष्टीच्या आत व बाहेर आहात, तरीही सर्वांसाठी अदृश्य आहात.’
मायाजवनिकाच्छन्नमज्ञाधोक्षजमव्ययम् । न लक्ष्यसे मूढदशा नटो नाट्याधरो यथा । अर्थात, ‘आपण इंद्रियांच्या जाणिवेच्या मर्यादित कक्षेपलीकडे असल्याने शाश्वत निर्दोष तत्त्व असे आपण भ्रममय मायाशक्तीच्या आवरणाने आवृत्त आहात. ज्याप्रमाणे नाटकात पात्राची वेशभूषा केलेला नट ओळखू येत नाही, त्याप्रमाणे मूर्ख लोक आपणाला ओळखू शकत नाहीत.’ विषान्महाग्ने: पुऊषाददर्शना-दसत्सभाया वनवासकृच्छ्रत:। मृधे मृधेऽनेकमहारथास्त्रतो द्रौण्यस्त्रतश्चास्म हरेऽभिरक्षिता: अर्थात, “हे प्रिय कृष्ण! विषयुक्त अन्नापासून, मोठ्या अग्निकांडापासून, नरभक्षकांपासून, वनवासातील कष्टांपासून तसेच मोठ मोठ्या सेनानींद्वारा लढलेल्या युद्धांमध्ये आणि दुष्टांच्या सभेत संरक्षक या नात्याने आमचा बचाव केलात आणि आता अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून आम्हास वाचविले आहे.
यानंतर कुंती भगवंताच्या अनेक अवतारकार्याबद्दल आणि विशेषत: श्रीकृष्ण अवताराबद्दल वर्णन करते. जन्म कर्म च विश्वात्मन्नजस्याकर्तुरात्मन:। तिर्यङ्नृषिषु याद:सु तदत्यन्तविडम्बनम् अर्थात ‘हे विश्वात्मा, निष्क्रिय असूनही आपण कार्य करता, जीवनशक्ती आणि अजन्मा असूनही जन्म घेता, हे खरोखरच भ्रम उत्पन्न करणारे आहे. पशु, मानव, ऋषी आणि जलचर यांच्या रूपाने आपण स्वत: अवतार घेता, हे अगदी भ्रमित करणारे आहे.’ गोप्याददे त्वयि कृतागसि दाम तावद् या ते दशाश्रुकलिलाञ्जनसम्भ्रमाक्षम् । वत्रं निनीय भयभावनया स्थितस्य सा मां विमोहयति भीरपि यद्बिभेति
अर्थात ‘हे कृष्ण, जेव्हा तुम्हीं दह्याचा माठ फोडण्याचा अपराध केला होता. तेव्हा यशोदामातेने तुम्हाला बांधण्यासाठी दोर घेतला. त्यावेळी भीतीने विचलित झालेल्या तुमच्या नेत्रांमध्ये अश्रू वाहू लागले. त्यामुळे डोळ्यांमधील काजळ धुवून गेले. प्रत्यक्ष भयही ज्यांना घाबरते, असे आपण अधोमुख अवस्थेत उभे होता. तुमची ही लीला (हे दृश्य) मला संभ्रमात टाकते.’ केचिदाहुरजं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये । यदो: प्रियस्यान्ववाये मलयस्येव चन्दनम् । अर्थात ‘काहीजण म्हणतात की पुण्यवान राजांच्या कीर्तीसाठी आजन्म असे आपण जन्म घेत आहात, तर काहीजण सांगतात की आपले अतिप्रिय भक्त महाराज यदु यांना आनंदित करण्यासाठी आपण आला आहात. अर्थात त्यांच्या वंशामध्ये (यदुवंशात) आपण असे अवतरित झाले आहात, जसे मलय पर्वतामध्ये चंदन प्रकट होते.’ अपरे वसुदेवस्य देवक्मयां याचितोऽभ्यगात् । अजस्त्वमस्य क्षेमाय वधाय च सुरद्विषाम् । अर्थात ‘अन्य लोक म्हणतात की, वसुदेव आणि देवकी या दोघांनी आपली प्रार्थना केल्यामुळे, त्यांचे पुत्र म्हणून आपण जन्म घेतला आहे. आपण नि:संशयपणे अजन्मा आहात, पण देवतांचे कल्याण व्हावे आणि जे त्यांचा द्वेष करतात, त्यांचा नाश करणे, यासाठी आपण स्वेच्छेने जन्म घेता.’ भारावतारणायान्ये भुवो नाव इवोदधौ ।सीदन्त्या भूरिभारेण जातो ह्यात्मभुवार्थित: अर्थात ‘अन्य असे म्हणतात की, समुद्रात असलेली नौका ज्याप्रमाणे ओझ्यामुळे भारयुक्त होते, त्याप्रमाणे पृथ्वी भाराक्रांत झाली, तेव्हा आपले पुत्र ब्रह्मदेव यांनी प्रार्थना केल्यामुळे आपण ते दु:ख हरण करण्यासाठी आविर्भूत झाला आहात.’
भवेऽस्मिन् क्लिश्यमानाना मविद्याकामकर्मभि:। श्र्रवणस्मरणार्हाणि करिष्यन्निति केचन । अर्थात ‘अन्यही काहीजण म्हणतात की, भौतिक कष्टांनी पीडित झालेले बद्ध जीव लाभान्वित व्हावेत व त्यांना मुक्ती मिळावी, म्हणून श्र्रवण-स्मरण पूजन आणि विविध प्रकारच्या भक्तिमय सेवेचे पुनऊज्जीवन करण्यासाठी आपण आविर्भूत झाले आहात शण्वन्तिगायन्तिगृणन्त्यभीक्ष्णश: स्मरन्तिनन्दन्तितवेहितं जना:। त एव पश्यन्त्यचिरेण तावकं भवप्रवाहोपरमं पदाम्बुजम् । अर्थात ‘हे कृष्ण, जे आपल्या दिव्य कार्यांचे-लीलांचे सतत श्र्रवण, कीर्तन आणि स्मरण करतात किंवा इतरांना असे करताना पाहून आनंदित होतात, ते निश्चितच आपल्या श्री चरणकमळांचे दर्शन करतात, ज्या योगेच जन्म-मृत्यूचा प्रवाह थांबू शकतो.’ त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुपतेऽसकृत्। रतिमुद्वहतादद्धा गङ्गेवौघमुदन्वति । अर्थात ‘हे मधुपती, ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याविना सागराकडे सदैव वाहते, त्याप्रमाणे माझे लक्ष अन्यत्र न रमता अखंडपणे आपल्यावरच रमावे’. ह्या प्रार्थना केवळ कुंतीच्या भावना प्रकट करीत नाहीत तर जो प्रामाणिक हरिभक्तीच्या आध्यात्मिक मार्गावर आहेत त्याच्यासाठी, भगवंताना समजण्यासाठी आणि हरिभक्ती दृढ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
-वृंदावनदास








