कोकणवासीयांची प्रार्थना ; पण गणेशोत्सवातील नियोजनामुळे कोकणवासीयांना दिलासा.
न्हावेली / वार्ताहर
कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे, आणि तिचे सावंतवाडी येथील परिपूर्ण टर्मिनस गेले दशकभर केवळ कागदावरच आहे. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच हे एक ‘प्रलंबित स्वप्न’ बनले आहे. तरीही, यंदाच्या गणेशोत्सवात रेल्वे प्रशासनाने केलेल्या विशेष नियोजनामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यासाठी आशेचा एक किरण दिसू लागला आहे.
गणेशोत्सवातील विक्रमी नियोजन !
यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने अंदाजे ३८० विशेष रेल्वे फेऱ्या चालवून एक नवा आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश गाड्या कोकण-मर्यादित किंबहुना खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी मर्यादित असल्याने परराज्यातील प्रवाशांची गर्दी या गाड्यांमध्ये नव्हती त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार ही रोखला गेला. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने बहुतांश गाड्या ह्या तळकोकणापर्यंत म्हणजेच सावंतवाडी पर्यंत चालवल्या ज्यामुळे कोकणवासी चाकरमान्यांना कोकणातील प्रत्येक तालुक्यातील भागात जाण्यासाठी रेल्वेची सोय मिळाली. आणि यातूनच सावंतवाडी येथे परिपूर्ण टर्मिनस व कोचिंग डेपो असावा हे अधोरेखीत झाले.
तुतारी एक्स्प्रेसला LHB कोचची प्रतीक्षाच
कोकणची लोकप्रिय ११००३/४ दादर ते सावंतवाडी धावणारी ‘तुतारी एक्स्प्रेस’ अजूनही जुने आयसीएफ कोचने धावत आहे. परंतु अधिक सुरक्षित आणि आरामदायक असलेल्या LHB कोच या गाडीला द्यावे अशी मागणी कोकणातील प्रवासी करत आहेत. रेल्वे प्रशासनाने २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये हे अपग्रेड करण्याची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. यंदाच्या वर्षी सर्व गणेशोत्सव विशेष गाड्या ह्या जुन्या ICF डब्ब्यांनेच धावत आहेत हे कुठेतरी कोकणवासीयांना समजणारे नाही.
टर्मिनसच्या मार्गातील प्रमुख अडथळा : तिलारी धरणाचे पाणी
सावंतवाडी येथे परिपूर्ण टर्मिनस आणि कोचिंग डेपो उभारण्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे तो पाण्याचा प्रश्न. टर्मिनस करिता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होणे अत्यावश्यक असून जेणेकरून या ठिकाणी गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय निर्माण होईल.यासाठी तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी स्थानकात पुरवणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जलजीवन मिशन अंतर्गत १४ कोटींचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने शासनाला सादर केला होता परंतु त्या प्रस्तावाचे पुढे काय झाले हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. या प्रस्तावाला निधी मंजूर होऊन हे काम पूर्ण झाल्यावरच टर्मिनसच्या उभारणीला गती मिळण्याची आशा आहे.
प्रगतीपथावरील छोटी पाऊले-
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, गेल्या अनेक वर्षांपासून टर्मिनससाठी पाठपुरावा करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून, सावंतवाडी स्थानकात लिफ्ट आणि १७० मीटरचा निवारा शेड मंजूर झाला आहे. यासाठी टेंडरही निघाले आहे. ही छोटी पाऊले भविष्यातील मोठ्या प्रगतीची नांदी ठरतील, अशी आशा आहे.यंदा रेल्वेत कोकणपण दिसले.गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर तो कोकणवासीयांसाठी एक उत्सव आहे. कोकण रेल्वेने या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या प्रमुख रेल्वे स्थानकांवर स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी निःशुल्क व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.या उपक्रमामुळे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना कोकणची लोककला जवळून अनुभवण्याची संधी मिळत आहे. यानिमित्ताने, स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांचेही मनोधैर्य वाढले आहे. याबद्दल स्थानिक कलाकारांनी कोकण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत, तसेच कोकण रेल्वेने केवळ व्यासपीठाची सोय केली नाही, तर प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद करण्यासाठी अनेक गोष्टींवर भर दिला आहे. स्थानक परिसरात विशेष सेल्फी पॉइंट्स, आकर्षक विद्युत रोषणाई, कलात्मक रांगोळी आणि पूजा साहित्य स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामुळे स्थानकांवर गणेशोत्सवाचे चैतन्य ओसंडून वाहत आहे.यासोबतच, वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उद्घोषणांमुळे प्रवाशांना गाड्यांची अचूक माहिती मिळत आहे, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. हे सर्व नियोजन यशस्वी करण्यासाठी कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुण्यावरून तळकोकणासाठी एकही रेल्वे सेवा नाही.यंदाच्या गणेशोत्सवात पुण्याहून तळकोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी निराशा झाली आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी पुण्यावरून तळकोकणासाठी एकही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने पुणे आणि परिसरात राहणारे कोकणवासीय नाराज झाले आहेत.रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कोकणवासीय संघटना आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने यावर तोडगा काढण्याची आणि भविष्यात पुण्याहून कोकणासाठी नियमित रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
दिवा/पनवेल ते चिपळूण/खेड मेमू गाडी नको.-
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या दिवा/पनवेल-चिपळूण/खेड मेमू (MEMU) गाडीला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. ही गाडी मुंबईच्या बाहेरून सुटत असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील प्रवाशांना सोयीची ठरत नाहीये. त्यामुळे ही गाडी मुंबईतील दादर किंवा सीएसएमटी (CSMT) स्थानकावरून सोडावी, तसेच ही गाडी २० डब्यांची असावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोकणवासीयांची प्रार्थना: ‘बाप्पा, यंदातरी…
गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीय गणेशोत्सवात ‘बाप्पा, यंदातरी सावंतवाडीचे टर्मिनस पूर्ण होऊ दे,’ अशी प्रार्थना करत आहेत. यंदाच्या नियोजनाने निर्माण झालेल्या आशेवर ही प्रार्थना लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.









