चोरीच्या वाढत्या घटनांमुळे गोजगे कलमेश्वर मंदिरामध्ये आज गाऱ्हाणा घालण्याचा कार्यक्रम
वार्ताहर/उचगाव
गोजगे येथील कलमेश्वर मंदिरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या चोरीमुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. यावरती उपाय म्हणून चोरी केलेल्या चोरांवर देवाचा कोप व्हावा यासाठी सोमवार दि. 21 रोजी सायंकाळी 6 वाजता मंदिरामध्ये गाऱ्हाणा घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी संपूर्ण दिवस गावात बंदोबस्त वार पाळण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थान पंचकमिटीने दिली आहे. गोजगे गावचे जागृत देवस्थान कलमेश्वर मंदिर हे गावापासून दीड किलोमीटर अंतरावरती आहे. दर सोमवारी भाविकांची या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होत असते. अनेक भाविकांनी या मंदिरामध्ये घंटा, चांदीचे दागिने, समई अशा अनेक वस्तू भेटीदाखल देवाला अर्पण केलेल्या आहेत.
याच मंदिरात दोनवेळा चोरी झाल्याने गावातील भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच या चोरी प्रकरणात गावातील काही जणांचा सहभाग असल्याचा संशय गावातील पंचकमिटीला असल्याने या मंदिरामध्ये गाऱ्हाणा घालून अशा चोरट्या नागरिकांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी देवस्की पंच कमिटीने गाऱ्हाणा घालण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संदर्भात रविवारी देवस्की पंचकमिटी, ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष शिवाजी यळगे, गुरुनाथ बामणे, निरंजन अष्टेकर, मनोहर पाटील, कल्लाप्पा कांबळे, कल्लापा अष्टेकर, ज्योतिबा बेळगावकर याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सव्वा महिना मंदिर दर्शनासाठी बंद ठेवणार
सोमवार दि. 21 एप्रिलपासून पुढे सव्वा महिना सदर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. या मंदिराचे कुलूप सव्वा महिन्यानंतरच उघडण्यात येणार आहे. कोणत्याही भाविकाला दर्शनासाठी या मंदिराच्या परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या चोरांनी या मंदिरातील वस्तू चोरून नेल्या आहेत त्या त्यांनी सव्वा महिन्याच्या काळात आणून मंदिराच्या परिसरात ठेवाव्यात. अन्यथा देवावरतीच हा सारा भार घालण्यात आला आहे, अशी माहिती देवस्की पंच कमिटीने दिली आहे.









