प्रतिनिधी /बेळगाव
बिबटय़ा हाती लागला नसल्याने त्या परिसरातील 22 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने बिबटय़ाला जेरबंद करण्यास वनखात्याला यश मिळो, अशी प्रार्थना पालक आणि शहरवासियांनी गणरायाकडे केली आहे. सध्या दोन गजराजांच्या साथीने बिबटय़ाला पकडण्याची मोहीम सुरू असून गणराया या मोहिमेला यश देणार का? याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
गोल्फ मैदान परिसरातील वनराईमध्ये आसरा घेतलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यात वनखात्याला अपयश आले आहे. मात्र वनखात्याच्या अधिकाऱयांनी आपले प्रयत्न थांबविले नाहीत. प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन होत असतानाही शहरवासियांच्या सुरक्षेसाठी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी गोल्फ मैदानाभोवती रात्रंदिवस पहारा देत आहेत. बुधवारी संपूर्ण शहरात गणरायाचे आगमन मोठय़ा उत्साहात झाले. मात्र वनखात्याच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना गोल्फ मैदान परिसरातच थांबावे लागले. आपल्या कुटुंबापासून लांब राहून शहरवासियांच्या सुरक्षेसाठी वनखात्याच्या अधिकाऱयांना कर्तव्य पार पाडावे लागले.
गेल्या पंचवीस दिवसांपासून बिबटय़ाने गोल्फ मैदान परिसरात ठाण मांडले आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी ट्रप कॅमेरे, ठिकठिकाणी सापळे रचण्यात आले आहेत. दोन गजराजांच्या साहाय्याने संपूर्ण गोल्फ मैदान पालते घालण्यात आले. पण बिबटय़ाला जेरबंद करण्यात यश आले नाही. 250 एकरहून अधिक वनराई असलेल्या परिसरात बिबटय़ाने आसरा घेतला आहे. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण गोल्फ मैदानाभोवती वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करून बिबटय़ाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. गणेशचतुर्थी झाल्यानंतर बिबटय़ा जाणार, अशी चर्चा मिम्सच्या माध्यमातून सुरू आहे. बिबटय़ाचा शोध कधी लागणार, असा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे.









