शिवसेना राष्ट्रवादीची बटीक- प्रवीण दरेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव अयोध्या दौरा रद्द झाला यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता तरी शहाणपण घ्या असा टोला लगावत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याविषयी एका खासगी वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाला आहे रद्द झालेला नाही. त्यांचा दौरा निश्चित होईल अस मला वाटतयं यावर राज ठाकरे पुण्यात बोलणार आहेत. त्यांनी दौरा का स्थगित केला याविषयी ते सविस्तर बोलणार आहेत तोपर्यत धीर धरायला हवा. तोपर्यंत त्यावर बोलणं उचित होणार नाही असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा वापर राष्ट्रवादी करतेय
महाराष्ट्रातील नेत्यांचा भाजप वापर करतयं असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला यावर दरेकर म्हणाले, शिवसेना तसेच संजय राऊतांचा वापर राष्ट्रवादी काॅंग्रेस कसा वापर करतेय हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. राऊत गेली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा भोंगा म्हणून काम वठवताना दिसत आहेत. दुसऱ्याचा वापर कोण करतय यापेक्षा शिवसेनेचा वापर राष्ट्रवादी करतय यामुळे शिवसेना रसातळाला चाललीय हे पहावे असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते
पुढे ते म्हणाले, सत्ता असूनही शिवसेनेचा आलेख खाली चालला आहे. निवडणुकीत, संघटनात्मक आणि जनतेते हा आलेख दिसत आहे. भारतीय जनता पार्टीसोबत युती करून लढून आल्यानंतर राष्ट्रवादीचा प्रवक्ता म्हणून शिवसेने नेते संजय राऊतांनी महाविकास आघाडी केली, यावरून तुमच्या वापराने तुमचं नुकसानं होतय हे पाहावे असेही ते म्हणाले. राज ठाकरे, भाजपा यांच काय होतय हे लवकरच कळेल पण राष्ट्रवादीच्या वापराने सोन्यासारख्या शिवसेनेची दुर्दशा काय होतीय याची काळजी घ्या असा सूचक इशारा त्यांनी दिला.
काहीही झालं तरी भाजपकडे बोट दाखवतात.
भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध झाला या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीतील नेते आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. राज ठाकरेंचा दौरा स्थगित का झाला यावरून भाजपवर टीका करायची.तर दुसऱ्या बाजूला दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण यांच कौतुक करायचं. असं करून संजय राऊत आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत . काहीही झालं तरी भाजपकडे बोट दाखवतात. शिवसेना राष्ट्रवादीची बटीक आहे असेही ते म्हणाले. राज ठाकरेंविषयी पुतण्या मावशीचे प्रेम दाखवू नका असा टोलाही त्यांनी लगावला.








