शिक्षण, वैद्यकीयसह उद्योग-व्यवसायात योगदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी चालू वर्षीच्या प्रवासी भारतीय पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. यावर्षी प्रवासी भारतीय सन्मानासाठी 27 व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यात आली आहे. या विजेत्यांनी अद्वितीय योगदानाने भारतीय डायस्पोराला नावलौकिक मिळवून दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषदेच्या समारोप सत्रात प्रवासी भारतीय पुरस्कारांची वितरण करतील.
परदेशात राहणाऱ्या भारतीयांना दिल्या जाणाऱ्या ‘प्रवासी भारतीय सन्मान’ या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवडलेले सेलिब्रिटी 23 देशांमधील आहेत. शिक्षण, आरोग्य आणि उद्योग-व्यवसायासह इतर अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. यापैकी काही प्रमुख नावांमध्ये ब्रिटनमधील बॅरोनेस उषा कुमारी पाराशर (राजकारण), अमेरिकेतील डॉ. शर्मिला फोर्ड (समुदाय सेवा) यांचा समावेश आहे. इतर नावांमध्ये ऑस्ट्रेलियातील प्राध्यापक अजय राणे (सामुदायिक सेवा), ऑस्ट्रेलियातील डॉ. मारियालेना जोन फर्नांडिस (शैक्षणिक क्षेत्र) आणि रोमानियाचे जगन्नाथ शेखर अस्थाना (व्यवसाय) यांचा समावेश आहे. याशिवाय काही संस्थांनाही हा सन्मान दिला जाणार आहे.
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार (2025) साठी नावांची शिफारस ज्युरी-कम-पुरस्कार समितीने केली होती. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ज्युरी-कम-पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि उपाध्यक्ष म्हणून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, विविध क्षेत्रातील नामवंत सदस्य समितीचा भाग होते. एकमताने पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली.









