मडगाव : राज्यातील विविध मुद्ये घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या प्रतिमा कुतिन्हो यांनी काल बुधवारी अखेर आम आदमी पक्षाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघातून त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. काँग्रेस पक्ष सोडताना आपण घाई केली होती. परंतु आम आदमी पक्ष सोडताना आपण घाई केलेली नाही. पूर्ण विचाराअंतीच आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपण आजवर जात-पात-धर्म असा कोणताच भेदभाव न करता समाज सेवा केली आहे. त्याच पद्धतीने आपण आपले कार्य कायम ठेवणार असल्याची प्रतिक्रीया प्रतिमा कुतिन्हो यांनी व्यक्त केली आहे. म्हादई बचाव अभियान, तसेच म्हादई वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प जाहीर करणे, वेर्णा परिसरातील दोघा आजारी बहिणींना उपचारासाठी हॉस्पिटलात नेणे, नावेलीत झालेले अपघात प्रकरणी प्रतिमा कुतिन्हो आक्रमक राहिल्या होत्या.
गेल्या दहा महिन्यापासून आपण आम आदमी पक्षापासून दूर राहिले होते. मात्र, जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने कार्यरत होते. आम आदमी पक्षाने कार्य करण्याची संधी दिल्याने आपण त्याचे आभार मानते. आप विषयी आपल्या कोणत्याही तक्रारी नाहीत. मात्र, दडपणाखाली काम करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने गोव्यात नवी कार्यकारिणी जाहीर केली. यात राज्यातील पक्षाची धुरा अमित पालेकर यांच्याच हाती ठेवली असून, आमदार व्हेन्झी व्हिएगश व व्रुझ सिल्वा यांची राष्ट्रीय संयुक्त सचिव व राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. या समितीत प्रतिमा कुतिन्हो यांना उपाध्यक्षपद देण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.









