मडगाव : साल 2020 मधील इंधन दरवाढीच्या आंदोलनादरम्यान प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना काल रविवारी मडगाव पोलिसांनी अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ प्रतिमा कुतिन्हो व इतरांनी हिंदूच्या धार्मिक विधीनुसार स्कुटरची मिरवणूक काढली. यावेळी ‘राम नाम सत्य है’ अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी हिंदूच्या भावना दुखावल्याची तक्रार अंकित साळगावकर यांनी नोंद केली होती. त्यानंतर 2020 मध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता.
मडगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रतिमा कुतिन्होंच्या विरूद्ध अटक वॉरंट जारी करून त्यांना कोर्टात हजर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. प्रतिमा कुतिन्हो न्यायालयीन सुनावणीस उपस्थित रहात नसल्याने हा वॉरंट जारी केला होता. त्यामुळे रविवारी मडगाव पोलिसांनी नावेली येथे जाऊन प्रतिमा कुतिन्हो यांना अटक करून पोलिसस्थानकात आणले. दरम्यान, आपण हिंदूच्या भावना दु:खावलेल्या नाहीत. इंधन दरवाढ करण्यात आल्याने निषेध नोंदवण्यासाठी स्कुटरची प्रेत यात्रा काढली होती व त्यावेळी ‘राम नाम सत्य है’च्या घोषणा दिल्या होत्या. आपल्या सोबत इतरांनीही घोषणा दिल्या होत्या. पण, पोलिसांनी फक्त आपल्यालाच अटक केली. यामागे षडयंत्र असल्याचा आरोप प्रतिमा कुतिन्हो यांनी केला.









