सरावादरम्यान उजव्या पायाला दुखापत
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी महिला आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीआधीच भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची सलामीची फलंदाज प्रतीका रावल दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यातून बाहेर झाली आहे. रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना प्रतीका रावलला दुखापत झाली असून तिच्या जागी शेफाली वर्माला संधी देण्यात आली आहे.
बांगलादेशविरुद्ध अखेरच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतीकाच्या उजव्या पायाला दुखापत झाली. यानंतर ती फिजिओचा आधार घेत मैदानाबाहेर गेली. प्रतीका यंदाच्या स्पर्धेत फॉर्ममध्ये आहे. आता तिलाच दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. क्षेत्ररक्षण करताना प्रतिकाचा उजवा पाय मुरगळला, त्यानंतर ती बांगलादेशविरुद्ध सामन्यात फलंदाजीसाठी आली नाही आणि आता ती 30 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. प्रतिकाच्या जागी आता शेफाली वर्माला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात अमनजोत कौरला ओपनिंग करण्याची संधी दिली जाऊ शकते. प्रतिकाच्या गैरहजेरीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिने ओपनिंग केली होती. याशिवाय, निवड समितीकडे हरलीन देओलचा पर्याय देखील असणार आहे.









