डॉ. सतीश जारकीहोळी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : भातकांडे स्पोर्ट्स अकादमी व वाल्मिकी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश जारकीहोळी कर्नाटक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून प्रथमेश मोरे-हुबळी संघाने मराठा स्पोर्ट्स ग्रामीणचा व नागनाथ इलेव्हनचा तर शाम युनायटेड कोप्पळने गोकाक स्ट्रायकर्स व डॉ. पुनीत राजकुमार संघाचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. अझरअली, गणेश कोप्पळ, अर्जुन भोसले, रमेश गंगावती यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
सरदार्स हायस्कूल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात प्रथमेश मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 96 धावा केल्या. त्यात अझरअलीने 44 षटकार, 2 चौकारासह 19 चेंडूत 53, देवराजने 2 चौकारासह 17 तर मंजुने 16 धावा केल्या. नागनाथ इलेव्हनतर्फे रमेश के.ने 9 धावांत 5 तर राहुलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नागनाथ इलेव्हनचा डाव 7.4 षटकात 83 धावांत आटोपला. त्यात गौतमने 2 षटकार 2 चौकारांसह 27 तर संतोषने 2 षटकारासह 17 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे उमेश गावनरने 15 धावांत 3 तर मोहीन खानने 13 धावांत 3, रोहीत व अर्जुन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात डॉ. पुनीत इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात सर्वगडी बाद 47 धावा केल्या. त्यात सिद्धूने 16 तर नामदेव गुरवने 14 धावा केल्या. शाम युनायटेड कोप्पळतर्फे लक्ष्मण कोप्पळने 5 धावांत 5, दिनेश कोप्पळने 9 धावांत 3 तर गणेश कोप्पळने 14 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोप्पळ संघाने 3.5 षटकात 2 गडी बाद 49 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. गणेश कोप्पळने 5 षटकार 2 चौकारांसह 45 धावा केल्या. डॉ. पुनीततर्फे महेश गवस व कृष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात प्रथमेश मोरेने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 105 धावा केल्या. त्यात अर्जुन भोसलेने 6 षटकार, 1 चौकारासह 14 चेंडूत 44, देवराज कोटीने 2 षटकारासह 17, मुराई देसाईने 15 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्स ग्रामीणतर्फे संकेत व नागराज रोट्टी यांनी प्रत्येकी 2 तर भरतने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाने 8 षटकात 5 बाद 83 धावा केल्या. अभिजित पाटीलने 3 षटकार 3 चौकारांसह 35, प्रथमेशने 14 तर संकेतने 12 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे उमेशने 2 तर मोहीनने 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात शाम युनायटेड कोप्पळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 123 धावा केल्या. त्यात रमेश गंगावतीने 5 टकार 2 चौकारासह 46 तर शिवराज कोप्पळने 3 षटकार 1 चौकारासह 27 धावा केल्या. गोकाक स्ट्रायकर्सतर्फे प्रथमने 2 अनिल नाईक, अश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोकाक स्ट्रायकर्सने 8 षटकात 4 गडी बाद 80 धावा केल्या. त्यात सिकंदरने 2 षटकार 5 चौकारांसह 43 तर अत्तुने 1 षटकार 3 चौकारांसह 25 धावा केल्या. कोप्पळतर्फे रमेश गंगावतीने 12 धावांत 2 तर सद्दाम व गणेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे महांतेश नाईक, मिलिंद भातकांडे, राजशेखर तळवार, सचिन चव्हाण, वीरगौडर पाटील, जॉन यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.









