एक राजा होता. तो सकाळीच उठून फुलाकडे गेला. आणि त्याने फुलाला विचाल्लं, ‘फुला ले फुला तुला वाश् कोणी दिला?’ मोठी गंमत आहे! ही आहे नातवाने आजोबांना सांगितलेली गोष्ट! पुलंच्या लेखनात आपल्याला ही गोष्ट सापडते. या ओळींच्या पुढे असलेली पुलंची कॉमेंट विलक्षण आहे. ते म्हणतात, सकाळी सकाळी उठून राज्याची खबर घेण्याऐवजी आपल्या बागेतल्या फुलाकडे जातो म्हणजे तो बहुधा ‘शांतिनिकेतन’चा विद्यार्थी असावा. पण त्याहून मोठी गंमत म्हणजे इतक्या छोट्या मुलाला किती म्हणून सुंदर साजरा प्रश्न पडावा! फुलाला सुगंध कोण देतं या प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर शोधणं काही फार कठीण नाही. पण विचारणाऱ्या बाळाची निरागसता, त्याच्या इवल्याशा मनात न मावणारी प्रचंड उत्सुकता, त्याच्या कल्पनेच्या राज्यातली अजूनही त्याच्याशी बोलणारी फुलं पानं हे सगळं त्यात कसं बरं येणार? ते उत्तर हे सत्य आहे तर त्याची ही पार्श्वभूमी म्हणजे आयुष्यातलं शिवसुंदर आहे असं म्हणावं लागेल. प्रश्न सुद्धा कुणाला पडतो याच्यावर त्याच्या उत्तराची व्याप्ती आणि विवरण अवलंबून असतं. प्रश्न, प्रश्न, अगणित प्रश्न आपल्या मनात रोज तयार होत असतात. आपण लहान असताना पडणारे प्रश्न आपल्या वयासोबत क्रमश: बदलत जातात. आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.
त्या छोट्या मुलाला पडणारे प्रश्न त्याच्या जगातले असतात. आई आणि बाबा हे मुलांचं पहिलं जग
त्यामुळे आई आणिक बाबा यातिल कोण आवडे
अधिक तुला सांग मला रे सांग मला.
यासारखे प्रश्न ती एकमेकांना विचारतात. हे गीत लिहिलं गेलं तेव्हाची परिस्थिती आज मुळीच राहिलेली नाही. आता आई बाबांच्या बरोबरीने कमवते. आकाशाला गवसणी घालते पण प्रश्न मात्र आजही शिल्लक आहे बरं!
पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची?
मम्मी माझ्या पप्पांची हेही असेच प्रश्न. ज्यांचं उत्तर हे विचारणाऱ्यालाही माहीत असतं. त्याला त्या प्रश्नातून आपल्या सुखी कुटुंबाचं चित्र रेखायचं असतं एवढंच. हे सुखी प्रश्नचित्र रेखाटलंय शांता शेळके यांच्या लेखणीने आणि संगीत आहे सी. रामचंद्रांचं. गायक आहेत चक्क अरुण सरनाईक. ते एक छान गायकही होते हे थोड्याच लोकांना माहीत असेल. अशी निरागस गाणी गात आणि ऐकत मुलं मोठी होत असतात. त्यांच्या भोवतालचं जग हे कल्पनेच्या राज्यातलं नंदनवन असतं. तिथे
प्राजक्ताची नाजूक फुले टिकाऊ का नाहीत?
रंगीत फुलात वास घालणे विसरलात का घाईत?
असे प्रश्न देवालाही विचारले जातात. किंबहुना
कुणीतरी सांगेल का देव आहे कसा?
हा देव तरी आहे कसा, पाहू त्याला कोठे कसा?
इतके मोठे मोठे, वयाला न शोभणारे प्रश्नही या छोट्यांना पडतात. आणि मग अशाच एखाद्या छोट्या मुलाकडे पाहून काळीज चरचर जळत जाईल असा प्रश्न कवी अनिल यांना पडला होता. ते म्हणतात,
कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या कोकिळा?
रात्री तरी गाऊ नको.
शिणवू नको अपुला गळा!
आईच्या चिरविरहात जळणाऱ्या त्या मुलाने त्या भळभळत्या जखमेला व्यक्त करण्यासाठी, दवा म्हणून, दुवा म्हणून, सगळं म्हणून फक्त गाण्याची सोबत धरली होती. त्याचं ते सुरेल दु:ख त्यांच्या कविमनाला साहवेना आणि हे गाणं त्यांच्या लेखणीतून उतरून थेट पंडित वसंतराव देशपांडे यांच्या कंठी जाऊन विसावलं. त्या प्रश्नाची दाहकता ऐकायची असेल तर पंडितजींचं ते गीत ऐकावं. ते वैफल्य काही काळ ऐकणाऱ्यालाही वेढून टाकतं.
बालवय सरतं तशी प्रश्नांची जातकुळीच बदलते.
चॉकलेट लाइमज्यूस आइक्रीम टॉफियाँ
पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ?
गुडिया खिलौने मेरी सहेलियाँ
अब मुझे लगती है सारी पहेलियाँ
ये कौनसा मोड़ है उम्र का?
हम आपके है कौन? (हाही एक मोठा प्रश्नच!). मधली पहिल्या प्रेमात फुलून आलेली आरशासमोरची नटखट, बावरी माधुरी आठवते की नाही? तिला पडलेले हे प्रश्न म्हणजे रंगबावऱ्या यौवनाची नांदीच! पहिलं प्रेम, त्याची हुरहूर हे सगळं सगळं त्यातून दिसतं. जणु इवलाली प्रश्नकळीच उमलून उत्तरपुष्पी वयात येते. आता तारुण्य म्हणजे प्रेमाचं गाव! पण त्या गावाच्या वाटेवर काही कमी प्रश्न नसतात. तो किंवा ती, माझ्यावर प्रेम करते का? मला जे वाटतं तेच प्रेम का? मी यातून कसं पार होऊ? हे टिकेल का?
ये दिल तुम बिन, कहीं लगता नहीं, हम क्या करें
ये दिल तुम बिन, कहीं लगता नहीं, हम क्या करें
तसव्वुर में कोई बसता नहीं, हम क्या करें
तुम्ही कह दो, अब ऐ जानेवफा, हम क्या करें.
यासारखे प्रश्न तर फारच गंभीर! (लता- रफी- साहिर या त्रयीने गानप्रेमींच्या मनाला लावलेलं खूळ कसं बरं करावं हाही एक अनुत्तरित प्रश्न त्यात आहेच!तो बाजूलाच पडून राहतो.) अशा प्रेमप्रश्नांचं उत्तर एकाच माणसाने देणं अपेक्षित असतं आणि हा प्रश्न म्हणजे म्हणावं तर प्रश्न आणि म्हणावं तर फारच गोड तक्रार असते. हे तक्रारप्रश्न शास्त्राrय संगीतालाही छळायला मागेपुढे पाहत नाहीत! उदाहरणार्थ,
काहे अब तुम आये हो मेरे द्वारे?
सौतन संग जागे अनुरागे रस पागे भागे
हा एक अतिगंभीर प्रश्न म्हणजे सोहनी रागातली एक अत्यंत सुरेख आणि सुप्रसिद्ध बंदिश आहे. पंडिता मालिनीबाई राजूरकर यांच्या स्वरातील ही दमदार, उत्कृष्ट बंदिश म्हणजे बोलक्या प्रश्नाचा सुरेल नमुना आहे. सोहनीसारख्या सतत ‘झेपावे उत्तरेकडे’ स्वरूपाच्या रागातून प्रियकराने आपली वंचना केल्याचा प्रचंड भयाकारी संताप तितक्याच संयमाने परंतु ठाशीवपणे ती प्रेयसी व्यक्त करते हे प्रभावीपणे दाखवावं ते मालिनीताईंनीच! त्याला तोड नाही. हे असे आणि यापेक्षाही पुढचे प्रश्न बरेच असतात. ते कोणते? हा प्रश्न तूर्तास तरी तसाच ठेवूया. आणि पाहूया पुढच्या भागात.
-अॅड.अपर्णा परांजपे-प्रभु