प्रेमीयुगुल आत्महत्या प्रकरणाला कलाटणी, पोलिसांना लेखी निवेदन
बेळगाव : लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून करून येळ्ळूर येथील एका तरुणाने स्वत:चेही जीवन संपविल्याच्या प्रकरणाला तरुणाच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपामुळे कलाटणी मिळाली आहे. त्याचाही घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांना एक अर्जही देण्यात आला आहे. ऐश्वर्या महेश लोहार (वय 18) रा. नवी गल्ली, शहापूर, प्रशांत यल्लाप्पा कुंडेकर (वय 28) रा. कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर या दोघा जणांच्या खून व आत्महत्याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटलबाहेर दोघांच्याही नातेवाईकांनी गर्दी केली होती. रमाकांत कोंडुसकर, नगरसेवक रवी साळुंखे, ग्रा. पं. सदस्य सतीश पाटील, रमेश मेणसे यांच्यासह शहापूर, येळ्ळूर येथील नेते व दोघांच्याही कुटुंबीयांनी शवागाराबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे शवागाराबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी, माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार यांच्यासह इतर अधिकारीही शवागाराबाहेर उपस्थित होते. बुधवारी सकाळी प्रशांत कुंडेकरचे वडील यल्लाप्पा कुंडेकर व कुटुंबीय शहापूर पोलीस स्थानकात दाखल झाले. मंगळवार दि. 4 मार्च रोजी प्रशांतला बोलावून घेण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या त्याच्या मृत्यूत संशय आहे. त्याचाही घातपात झाला असावा, त्यामुळे एफआयआर दाखल करून घ्यावा, अशी मागणी केली. यासंबंधी लेखी स्वरुपात निवेदनही देण्यात आले आहे.
संशयाच्या अनुषंगानेही तपास करण्यात येणार
दरम्यान, शवचिकित्सा प्रक्रिया सुरू असताना प्रशांतच्या पोटात कीटकनाशक आढळून आले आहे. त्याने ऐश्वर्याच्या खुनानंतर स्वत:चेही जीवन संपविण्यासाठी आधी विष पिऊन नंतर स्वत:वरही वार करून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यामुळे त्या अनुषंगानेही तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशांतच्या शरीरावर असलेल्या जखमा स्वत:च हल्ला केल्यावर झालेल्या आहेत का? याचीही तज्ञांकडून माहिती घेण्यात येत आहे.









