आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त पहिली गोमंतकन्या : टोरेंटो चित्रपट महोत्सवात गोव्याचा गौरव
पणजी : टोरेंटो येथे झालेल्या 14व्या दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रशांती तळपणकर यांना प्राप्त झाला आहे. कोंकणी चित्रपटातील भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणारी तळपणकर ही पहिली गोमंतकीय अभिनेत्री ठरली आहे. मंगुरीश बांदोडकर दिग्दर्शित ‘आंसेसांव’ या कोकणी लघुपटाला सर्वोत्कृष्ट फिल्मचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यातील मनमोहक अभिनयासाठी तळपणकर यांना ही उल्लेखनीय ओळख मिळाली आहे.
9 ते 19 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या महोत्सवात 22 भाषांमधील 120 चित्रपटांचा प्रभावी लाइनअप दाखवण्यात आला होता. त्यात विविध वैशिष्ट्यापूर्ण चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांच्या माध्यमातून दक्षिण आशियाई चित्रपटांची समृद्धता दर्शविली गेली होती. या उत्साहवर्धक पोर्टफोलिओमध्ये आठ लघुपट आणि 17 वैशिष्ट्यापूर्ण चित्रपट होते. त्यासाठी एकत्रित असे केवळ दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पैकी तळपणकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर सुमन सेन यांना त्यांच्या ‘क्राय मी अ रिव्हर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला.
अनेक भाषा आणि शैलींमध्ये कार्यरत असलेल्या तळपणकर यांनी गोव्यातील चित्रपट आणि नाट्यासृष्टीत स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविलेल्या ‘पलतडचो मनीस’, ‘अलिशा‘, ‘आमोरी’, ‘बागा बीच’, ‘जुझे’ (कोंकणी) आणि ‘कभी पास कभी फेल‘ (हिंदी) यासारख्या चित्रपटांचा समावेश असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
तऊण चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा द्या: प्रशांती
दरम्यान, ‘आंसेसांव’ या लघुपटातील आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल बोलताना 62 वर्षीय तळपणकर यांनी सर्वप्रथम सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी, या पुरस्कारावरून तऊण चित्रपट निर्माते हे गोव्याचे आणि कोकणी भाषेतील भारतीय चित्रपटांचे भविष्य असल्याचे सिद्ध होते, असे सांगितले. त्यामुळे गोमंतकीय प्रेक्षकांनी या चित्रपटांना थिएटरमध्ये पाठिंबा देणे आणि सरकारने आवश्यक आर्थिक मदत करणे आवश्यक आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.









