चिपळूण :
आपण दोन कारणांसाठी वाशिष्ठी डेअरीला भेट दिली. त्यातील एक कारण म्हणजे आपण प्रशांत यादव यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली आहे. ते पक्षात आल्यास त्यांना बरोबर घेऊन जाऊ, त्यांच्यासोबत काम करू अशी ग्वाही दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मीही २५ वर्षे राजकारण करतोय, त्यामुळे आमच्या मतदार संघात येऊन जर कोणी ढवळाढवळ करणार असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे अजित पवार राष्ट्रवादी मित्रपक्षातील नेत्यांना दिला आहे.
ते पुढे म्हणाले, एक मराठी उद्योजक इतके चांगले काम करीत असेल तर राजकारण बाजूला ठेऊन त्या उद्योगासाठी प्रशासकीय पातळीवर काय सहकार्य करता येईल का याची चर्चा करण्यासाठी आपण वाशिष्ठी दूध प्रकल्पाला भेट दिली. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे उद्घाटन माझ्या हस्तेच झाले आहे. त्यामुळे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन आपण यादव यांना दिले आहे.
- गोगावलेंच्या बोलण्याचे राजकारण नको
खासदार नारायण राणे यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. त्यांच्यामुळे कोकणचा विकास झाला हे कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे भरत गोगावले बोलण्याच्या ओघात जे काही राणेंबाबत बोलले त्याचे कोणीही राजकारण करू नये असे मतही सामंत यांनी व्यक्त केले.
- हिंदीची सक्ती करणारे मराठीच्या प्रेमात
ज्यांच्या कार्यकाळात हिंदीची सक्ती आली तेच आता मराठीच्या प्रेमात पडले आहेत. त्यांच्या याबाबतच्या अनेक मुलाखती आहेत. त्या सर्वांनी ऐकाव्या व नंतर यांना आत्ताच मराठीचे प्रेम का उफाळून आले याचा विचार करून जाब विचारावा अशी टीका सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
- नाराजांची समजूत काढणार
येथील माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह ६ नगसेवक नाराज आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले असता सामंत यांनी नाराज कोणीही नसेल तरीही त्यांची समजूत काढली जाईल असे सांगितले. त्यानंतर शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. तसेच ५ जुलै रोजी बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहरप्रमुख उमेश सकपाळ, विनोद झगडे आदी उपस्थित होते.
- प्रवेश घेताना मित्रपक्ष म्हणून चर्चा करायला हवी होती..
सध्या मित्रपक्ष आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत नाही. अजित यशवंतराव आपले चांगले मित्र आहेत. मात्र टीका करताना ते भान विसरले. अशा व्यक्तीला प्रवेश देताना किमान मित्र पक्ष म्हणून आमच्याशी चर्चा करणे गरजेचे होते. मात्र तसे केले गेले नाही. त्यामुळे आमच्या मतदारसंघात येऊन आमच्याशी चर्चा न करता कोणी परस्पर निर्णय घेणार असेल तर त्यांना तसेच उत्तर दिले जाईल. मीही २५ वर्षे राजकारणात आहे याचा कोणालाही विसर पडू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.








