दिवंगत रघुवंश प्रसाद सिंहांच्या घरापासून प्रारंभ
वृत्तसंस्था/ हाजीपूर
निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांनी 5 मे रोजी बिहारमधील सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. स्वतःच्या राजकीय मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी जन सुराज (स्वराज्य) अभियानाची सुरुवात राजदचे दिग्गज नेते राहिलेले दिवंगत रघुवंश प्रसाद सिह यांच्या घरापासून बुधवारी केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत प्रशांत किशोर हे वैशाली जिल्हय़ाच्या दौऱयावर आहेत.
जन सुराज राजकीय मोहिमेच्या अंतर्गत पूर्ण बिहारमधील महनीय व्यक्ती तसेच सर्वसामान्यांशी संवाद साधल्यावर प्रशांत किशोर हे 2 ऑक्टोबरपासून चंपारण्य येथून पदयात्रा सुरू करणार आहेत. सुमारे 3 हजार किलोमीटर पर्यंतचा पायी प्रवास करत ते लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. बिहारमध्ये बदल इच्छिणाऱया प्रत्येक व्यक्तीला भेटणार आहे. लोकांशी संवाद साधल्यावरच राजकीय पक्षाच्या स्थापनेचा निर्णय घेणार असल्याचे प्रशांत यांनी म्हटले आहे.
बंगालमधील निवडणुकीनंतर काही तरी नवे करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी राजकारणात स्वतः प्रवेश करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. आता मी देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षासोबत काम करणार नाही. काँग्रेस पक्षाने निवडणूक जिंकण्याचा माझा रिकॉर्ड खराब केला असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
2011-21 या 10 वर्षांमध्ये मी 11 निवडणुकांशी जोडला गेलो आणि केवळ एकाच निवडणुकीमध्ये पराभव सहन करावा लागला. उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत असताना हा प्रकार घडला होता. तेव्हापासून काँग्रेससोबत काम करणार नसल्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाबद्दल आदर असला तरीही त्याची सद्यस्थिती स्वतः बुडण्याची आणि इतरांनाही बुडविण्याची असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.









