संयुक्त जनता दलाचा आरोप
वृत्तसंस्था/ पाटणा
संयुक्त जनता दलाने निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नसून ते भाजपसाठीच काम करतात, असा आरोप संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंग ऊर्फ लालन यांनी केला आहे. प्रशांत किशोर यांनी दोन दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा आरोप करण्यात आल्यामुळे तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
नितीशकुमार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलाने दिलेला प्रस्ताव आपण नाकारल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरही लालन यांनी टीका केली. प्रशांत किशोर हा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून तो निवडणूक तंत्र व्यावसायिक आहे. राजकीय पक्षांना निवडणुका जिंकण्यास साहाय्य करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याचा आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्याला प्रस्ताव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत किशोर ऑक्टोबरपासून बिहारमध्ये 3 हजार 500 किलोमीटर लांबीची यात्रा करणार आहेत. या अभियानाचे नाव त्यांनी जनसुराज्य असे ठेवले असून बिहारच्या जनतेमध्ये राजकीय पक्षांच्या अनास्थेसंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची किशोर यांची योजना असल्याची चर्चा आहे. मात्र, स्वतः किशोर यांनी यासंबंधी आतापर्यंत मौन बाळगलेले आहे.









