विविध राजकीय पक्षांना निवडणुकांच्या काळात धोरणविषयक सल्ला देणारे प्रशांत किशोर हे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षापासून काँगेसपर्यंत सर्व पक्षांशी त्यांचे या कारणासाठी संबंध आले आहेत. ते स्वतः (निदान अधिकृतरित्यातरी) कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत. पण प्रत्येक पक्ष निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी त्यांच्याकडून सल्ल्याची अपेक्षा करतो. त्यांना तसे ‘कंत्राट’ ही देतो. ते व्यावसायिक सल्लागार असून त्यांची पूर्वी एक सर्वेक्षण कंपनीही होती. सध्या ते त्या कंपनीपासून अलग झाले आहेत, असे सांगितले जाते. सध्या त्यांचा विचार करण्याचे कारण असे की ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे वृत्त पसरले आहे. अद्याप काँगेस किंवा प्रशांत किशोर यांनी यासंबंधी कोणतेही थेट भाष्य केलेले नाही. मात्र, गेला आठवडाभर ज्या प्रकारे त्यांनी काँगेस श्रेष्ठींशी बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे, तो पाहता अटकळींचा बाजार गरम झाला आहे. त्यांनी काँगेसला एक भविष्यकाळातील निवडणुकांसाठी एक ‘रोडमॅप’ही सादर केला आहे, अशा चर्चा आहेत. या निमित्ताने त्यांच्या आतापर्यंतच्या सल्लाव्यवसायाचा आढावा घेणे योग्य ठरेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते कोणाला माहित नव्हते. त्या निवडणुकीत ते भाजपच्या धोरणनिर्धारणकर्त्यांपैकी एक होते. त्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आणि प्रशांत किशोर यांचे नाव होऊ लागले. मात्र, नंतर त्यांचे भाजपशी पटले नाही. त्यामुळे भाजपशी नाते तोडून ते इतर पक्षांना सल्ला देऊ लागले. नितीश कुमार यांचा संजद, ममता बँनर्जींचा तृणमूल काँग्रेस, स्टॅलिन करुणानिधी यांचा द्रमुक तसेच काँगेस आदी अनेक पक्षांनी त्यांच्या या कौशल्याचा लाभ घेतल्याचे दिसून येते. पक्षाबाहेरच्या एखाद्या तज्ञाचा अशा प्रकारचा सल्ला निवडणूक जिंकण्यासाठी कितपत उपयोगी पडतो हा जरी वादाचा विषय असला, तरी काही अपवाद वगळता बहुतेक राजकीय पक्षांमध्ये त्यांची ‘पेझ’ दिसून येते. प्रशांत किशोर यांचा सल्ला म्हणजे हमखास विजय अशी भावना निर्माण झाल्याने ते आपल्या बाजूने असावेत यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसतात. प्रत्येक वेळी प्रशांत किशोर यांचा सल्ला विजयाला कारणीभूत ठरतो हे मात्र खरे नाही. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सल्ल्यानेच काँगेस आणि सप यांची युती झाली होती असे सांगितले गेले. तथापि, त्या युतीचा सपशेल पराभव झाला आणि काँगेसला तर लढवलेल्या 105 जागांपैकी अवघ्या 7 जागांवर विजय मिळाला. तथापि, 2015 मधल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आणि 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांना सल्ला देण्याचे काम त्यांनी केले होते आणि या नेत्यांच्या पक्षांना विजयही मिळाला होता. एकंदर, एक बव्हंशी यशस्वी सल्लागार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. निवडणुकीला सामोरे जाणाऱया राज्यामध्ये ते प्रथम व्यापक मतदानपूर्व सर्वेक्षण (ओपिनियन पोल) घेतात आणि कोणता पक्ष किंवा युती विजयी होईल याचे अनुमान काढून नंतर त्या पक्षाचे सल्लागार बनतात, त्यामुळे त्यांच्या यशाचे प्रमाण जास्त आहे, असाही आरोप केला जातो. अलिकडच्या काळात निवडणूक सर्वेक्षणाचे तंत्र बरेच विकसीत झाले असून सर्वेक्षण योग्यरित्या केल्यास बरेचसे अचूक अनुमान काढता येते. तेव्हा, ते हे तंत्र उपयोगात आणत नसतीलच असे नाही. तर अशा प्रशांत किशोर यांच्याशी काँगेसने पुन्हा संधान बांधले असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी त्यांच्या सल्ल्याने केली जाणार आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की सल्लागाराचे कौशल्य कितीही असले आणि त्याने दिलेला सल्ला योग्य असला तरी तो लागू करणे न करणे हे पक्षनेतृत्वाच्या हाती असते. तसेच तो सल्ला प्रभावीपणे लागू करण्यासाठी त्या पक्षाकडे संघटनाशक्ती असावी लागते. नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठीही काँगेसने त्यांचा सल्ला घेतला होता अशी चर्चा होती. तथापि, या निवडणुकीच्या काही महिने आधी पंजाब काँगेसमध्ये जो सावळा गोंधळ झाला त्यामुळे पक्षाची प्रतिमा कमालीची डागाळली आणि याचा परिणाम निवडणुकीत भोगावा लागला. काँगेसला हेही राज्य गमवावे लागते. यातून हे स्पष्ट होते की केवळ सल्लागार निष्णात असले तरी निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणमैदानात असणाऱया पक्षाकडे स्वतःचे सामर्थ्य असावे लागते. तरच अशा बाहय़ सल्ल्यांचा उपयोग होतो. केवळ सल्लागाराच्या कौशल्यावर निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट आहे. म्हणूनच प्रशांत किशोर यांनी भाजपशी संबंध तोडल्यानंतरही अनेक निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड विजय मिळाला आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील दोन विधानसभा निवडणुका, 2019 ची लोकसभा निवडणूक आणि इतर राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचा समावेश आहे. स्वतः प्रशांत किशोर यांनीही मागे एकदा ही बाब अधोरेखित केली आहे. आपण कोणत्याही पक्षाला ‘विजयी’ करत नाही. तर त्या पक्षाला अनुकूल वातावरण असेल तर ते अधिक अनुकूल करण्यासाठी काय करता येईल, याच्या सूचना आपण करतो, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. याचाच अर्थ असा की केवळ आपल्यावर अवलंबून राहू नका, स्वतःचे सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करा, असेच त्यांनी राजकीय पक्षांना सुचविले होते. अर्थात काँगेस नेतृत्वाला याची कल्पना असेलच. कोणाचा सल्ला घ्यावा हा प्रत्येक पक्षाचा स्वतःचा विशेषाधिकार असतो. तथापि, निवडणूक जिंकण्याचा खरा प्रभावी मार्ग स्वतःचे बळ वाढविणे हाच असतो. सध्या यासंबंधात काँगेसची परिस्थिती फारशी चांगली नाही, हे स्पष्टच आहे. तेव्हा प्रशांत किशोर यांनी काँगेसमध्ये प्रवेश केलाच, तर ते कशाप्रकारे या पक्षासाठी सहाय्यभूत ठरतात हे येणारा काळच ठरविणार आहे. त्यांचा संभाव्य काँग्रेस प्रवेश ही सध्यातरी एक उत्कंठावर्धन राजकीय घडामोड आहे, असे म्हणता येते.
Previous Article‘फिनिशर’ धोनीमुळे मुंबई ‘फिनिश’!
Next Article सेन्को गोल्ड लिमिटेडचा येणार आयपीओ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








