कणकवली –
वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळातर्फे १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. याआधी सर्वश्री भारत सासणे, पुष्पा भावे, उत्तम कांबळे, सिसिलिया कार्व्हालो आदी साहित्यिकांना या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला आहे.प्रसाद कुलकर्णी यांची काव्य कारकीर्द प्रदीर्घ असून नऊ पुस्तके, दीड डझनहून अधिक चित्रपट, ध्वनिफिती, नामवंत गायकांनी गायलेली सव्वाशेहून अधिक गाणी याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील विविध व्यासपीठांवरून दिलेली व्याख्याने याकरता ते रसिकांना सुपरीचित आहेत. आनंदयात्रा हा त्यांचा आनंदाने आयुष्य जगण्याचा संदेश देणारा कार्यक्रम देश-विदेशात लोकप्रिय आहे. मराठी भाषेत सर्वप्रथम शुभेच्छापत्रांची सुरुवात करण्याचा मान त्यांना जातो. ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी यासाठी त्यांना ‘शुभेच्छांचा सौदागर’ ही उपाधी दिली आहे. शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी सेंट जोसेफ हायस्कूल नंदखाल, वसई येथे हे एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून साहित्य रसिकांनी त्याला भरगच्च उपस्थिती लावावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री रेमंड मच्याडो यांनी केले आहे.









