सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यू. कॉलेज या प्रशालेत इ . ६ वीत शिकणाऱ्या सोहम दिनेश साळगावकर याला राष्ट्रीय बाल श्री प्रसाद नागेश घाडी स्मृती कला पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे . सोहमला ओस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा नावाचा हाडांचा आजार आहे. या आजारात हाडे ठिसूळ होतात सोहम केवळ १ वर्षाचा असताना या आजाराचे निदान झाले. गोवा- मुंबई – पुणे सगळीकडे उपचार करुन झाले. यातून एक कळलं की, हा आजार बरा होणार नाही. सोहमने आणि त्याच्या पालकांनी ही परिस्थिती स्विकारली. सोहमचे पालक त्याला फुलासारखे जपतात हे शब्दशः खरे आहे कारण घरातील माणसांशिवाय सोहमला कुणीच उचलून घेवू शकत नाही. परंतू ह्या परिस्थितीवर सुद्धा मात करुन सोहमने अभ्यासासोबत संगीत आणि पेटीवादनाची साधना सुरु केली.अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या गीतगायन व पेटीवादनाच्या प्रत्येकी ३ परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या आहेत. त्याला चित्रकलेची आवड आहे. तसेच तो उत्तम प्रकारे बुद्धिबळ व कॅरम खेळू शकतो. तालुका तसेच जिल्हास्तरावर विविध स्पर्धांमध्ये भाग घेवून तो बक्षिसं पटकावतो. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळति’ हि उक्ती सोहमच्या बाबतीत म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परिस्थितीवर मात करत सोहमने दाखविलेल्या लढवय्या वृत्तीसाठी त्याला यंदा दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय बाल श्री प्रसाद नागेश घाडी स्मृती कला पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सोहमला मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व शिक्षकवृंद व पालक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री.पी.एम.सावंत व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .