कोल्हापूर :
जिल्हाधिकारी कशा पद्धतीने प्रशासकीय कामकाज करतात. हे जवळून पहावे, असे अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. ‘एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांसोबत’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची ही इच्छा पूर्ण होत आहे. सोमवारी या उपक्रमाला सुरवात झाली. पारगावच्या दहावीतील प्रसाद संजय जाधव या विद्यार्थ्यास एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांसोबत या उपक्रमामुळे दिवसभर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात थांबून ते कशा प्रकारे काम करतात याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयात शिकणाऱ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असते. याचबरोबर जिल्हाधिकारी कशा प्रकारे कामकाज करतात. याची माहिती घेण्याची उत्स्कुता असते. याचाच विचार करून ‘एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांसोबत‘ हा उपक्रम सुरू केला आहे. शिक्षण विभागाने जिह्यातील विविध शाळांमधून यासाठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत दिवसभर थांबण्याची संधी मिळणार आहे. या अंतर्गत सोमवारी पारगाव येथील पाराशर हायस्कूलमधील 10 वीचा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याला जिल्हाधिकाऱ्यांसोबत दिवसभर थांबण्याची संधी मिळाली. दुपारी 12 वाजता प्रसाद पालक आणि शिक्षकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्याचे स्वागत करून दालनामध्ये बसण्याची परवानगी दिली. प्रसादने दिवसभर जिल्हाधिकारी येडगे कशा प्रकारे काम करतात. हे अगदी जवळून पाहिले. येथील सुनावण्यासह जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रश्नांसाठी भेटणारी शिष्टमंडळे, अधिकाऱ्यांच्या बैठकामध्येही तो सहभागी झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतच्या बैठकीतही प्रसाद उपस्थित होता. जिल्हाधिकारी कसे काम करतात. समोरच्या व्यक्तीशी कसा संवाद साधतात, याची प्रसादने अनुभूती घेतली.
- जिल्हाधिकाऱ्यांसोबतची दुसरी भेट
प्रसाद हा शाळेच्या वत्तृत्व स्पर्धेत नेहमी सहभागी होतो. यापूर्वी त्याला जिल्हाधिकारी येडगे यांच्या हस्ते पारितोषिकही मिळाले आहे. यावेळी त्याने जिल्हाधिकारी व्हायचे असल्याचे बोलून दाखविले होते. सोमवारी त्यास एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांसोबत या उपक्रमामुळे प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांचे काम पाहण्याची संधी मिळाली.








