अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, माझ्याशिवाय हे जग तयार होऊ शकत नाही. त्यामुळे समोर जे जे दिसतंय ते ते माझेच रूप आहे असं समज. जरी समोर दिसणारी माझी रूपे त्रिगुणयुक्त दिसत असली तरी मी मात्र ह्या त्रिगुणांच्या पलीकडे असतो. ह्या तिन्ही गुणांच्या अवस्थांना, त्यांच्या दृश्य द्रष्टा आणि दर्शन ह्या त्रिपुटीना मी प्रकाशित करणारा असलो तरी मी स्वत: चौथ्या अवस्थेत असतो. त्याला तुरीय अवस्था असे म्हणतात. देह आणि प्रपंच नाहीसे झाले आणि भूतांचा भूतात लय झाला की, गुणांच्या तिन्ही अवस्था लय पावतात. असे झाले की, चौथ्या तुरीय अवस्थेचा प्रत्यय येतो. गुरुकृपेशिवाय तुरीय अवस्था अनुभवता येत नाही. प्रत्येकाच्या जागृती, स्वप्न व सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थेत माझ्या सत्तेनुसार कार्य चालते. हे कार्य चालण्यासाठी जे चैतन्य लागते ते तुरीय अवस्थेत राहून मी पुरवत असतो आणि त्यातून घडणाऱ्या घटना साक्षीभावाने पहात असतो. तुरीय अवस्थेत असलेल्या माझ्याशिवाय इतर अवस्थेत असलेल्या सजीव, निर्जीव व्यक्ती, वस्तू ह्या केवळ मिथ्या आहेत. त्यांना स्वत:चे अस्तित्व नाही. त्यांचे अस्तित्व माझ्या मर्जीवर अवलंबून आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था मिथ्या असल्याने तुरीय अवस्था हीच एकमेव खरी अवस्था होय. माझे हे सत्यस्वरूप वेदांनाही मान्य आहे. माझ्याशिवाय इतर गोष्टी मिथ्या का आहेत ते तुला समजावून सांगतो. जी गोष्ट कायम टिकणारी असते तीच सत्य असते आणि नाश पावणाऱ्या गोष्टी असत्य होत. म्हणजे जागृत अवस्थेत म्हणजे जागेपणी माणसाला त्या समोर दिसत असतात पण कालांतराने नष्ट होतात. म्हणून त्यांच्या तात्पुरत्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. स्वप्नात जे जे दिसते ते सगळे स्वप्नातून माणूस जागा झाला की, स्वप्नाप्रमाणेच नष्ट होते. तसेच मनुष्य निद्रावस्थेत गेला की त्याला जागृतीत जे त्याने पाहिले असते आणि स्वप्नात बघितले असते त्या सर्वांचाच त्याला विसर पडतो. म्हणून प्रपंच खरा नाही. मी सृष्टीची निर्मिती केल्यानंतर प्रपंचाची निर्मिती झाली. म्हणजेच सृष्टीपूर्वी प्रपंच नव्हता तसेच प्रलयानंतर काहीच उरत नसल्याने प्रपंचाचाही आपोआप नाश होतो. थोडक्यात मध्येच काही काळ प्रपंचाचा भास होतो आणि कालांतराने तो नाहीसा होतो म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं. प्रपंचाचे अवडंबर मोठे असते. व्यक्ती, वस्तू नामरूप धारण करतात आणि कालांतराने नष्ट होतात. पिता, पुत्र, नातू अशा एकामागून एक पिढ्या पुढे पुढे जात असतात. वेळ आली की एकामागून एक निघून जातात. ज्याप्रमाणे सागरात एक लाट उसळते दुसऱ्या क्षणी विरून जाते त्याप्रमाणे नावारूपाला घट्ट चिकटलेली माणसे नष्ट होत राहतात. तेव्हा प्रपंचाचं अस्तित्व नाममात्रच असतं पण परमात्मा स्वतंत्र असतो. ही गोष्ट अज्ञानी जाणत नसल्याने त्याला भवसागर तरुन जाणे दुस्तर वाटते. ज्याच्यापासून प्रपंच निर्माण झाला, ज्याने त्यात जिवंतपणा आणला आणि शेवटी त्याच्यातच निमला त्या निजात्म्याला तो जाणत नाही. प्रपंच हा ब्रह्मापेक्षा वेगळा असल्याने भगवंत त्याला जवळ करत नाहीत हे ज्याच्या लक्षात येतं तो ब्रह्मच होतो. उद्धवाच्या मनात आलं, हे इतकं सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ असताना सर्वजण प्रपंचाच्या इतके आहारी का जात असतील. त्याचाही खुलासा भगवंतानी केला तर किती बरं होईल. उद्धव आणि भगवंत देहाने वेगवेगळे दिसत असले तरी मनाने एकरूपच असल्याने उद्धवच्या मनातले विचार भगवंतांनी लगेचच जाणले आणि ते म्हणाले, मनुष्य प्रपंचाच्या आहारी जाण्यासाठी त्याचे मन मुख्यत्वाने कारणीभूत असते. इच्छा, द्वेष, सुख दु:ख असे अनेक विकार मनात असतात. मन शरीर आणि आत्मा ह्यातील असंतुलनातून मनाचे विकार म्हणजे मनाचे आजार निर्माण होतात.
क्रमश:








