वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम
2025 च्या अखिल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या 17 व्या मानांकित टोमा ज्युनियर पोपोव्हने प्रणॉयचा 21-19, 21-16 अशा सरळ गेममध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. 32 वर्षीय प्रणॉयने या सामन्यात पहिल्या गेममध्ये चिवट प्रतिकार केला. पण पोपोव्हच्या स्मॅश फटक्यामध्ये विविधता असल्याने प्रणॉयकडे वारंवार चुका झाल्याने त्याला हा सामना गमवावा लागला. प्रणॉयने 2023 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदके मिळविली होती. प्रणॉय आणि पोपोव्ह यांच्यातील हा सामना 53 मिनिटे चालला होता.









