वृत्तसंस्था/ ओडेनेसी (डेन्मार्क)
भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने पाठदुखापतीच्या समस्येमुळे आगामी होणाऱ्या डेन्मार्क खुल्या तसेच फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धांमधून माघार घेतली आहे.
31 वर्षीय प्रणॉयने नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. या स्पर्धेत त्याने पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शवून कांस्यपदक पटकाविण्याचा बहुमान मिळविला होता. हाँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रणॉयची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. 41 वर्षानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूष एकेरीत पदक मिळविणारा प्रणॉय हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.
पाठदुखापतीमुळे प्रणॉयला किमान 2 ते 3 आठवडे बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले. या समस्येमुळे आपण डेन्मार्क आणि फ्रान्स बॅडमिंटन स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही, असे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अलिकडेच झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा 15 वा मानांकित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्यावर भारताची प्रामुख्याने भिस्त राहिल. आशियाई क्रीडा स्पर्धेत लक्ष्य सेनने रौप्यपदक मिळविले होते. डेन्मार्क खुल्या सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा सलामीचा सामना थायलंडच्या वेंगचेरॉनशी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आर्किटीक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी भारताची पीव्ही सिंधू हिचा सलामीचा सामना स्कॉटलंडच्या गिलमूरशी होणार आहे. तसेच 20 व्या मानांकित किदांबी श्रीकांतचा सलामीचा सामना चीनच्या यांगशी होणार आहे. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरूष दुहेरीच्या ताज्या मानांकनात अग्रस्थान मिळविणारी भारतीय जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा सलामीचा सामना मलेशियाच्या सिन आणि यी यांच्याशी होत आहे. हांगझोऊ आशियाई स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक मिळविले होते. महिला दुहेरीत ट्रेसा जॉली, गायत्री गोपीचंद हे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.









