वृत्तसंस्था/ जकार्ता
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयने पुरुष एकेरीत तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. दरम्यात किदाम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एच. एस. प्रणॉयने जपानच्या कोदाई नाराओकाचा 21-18, 21-6 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. या लढतीत तृतीय मानांकित नाराओकाला प्रणॉयने आपल्या वेगवान स्मॅश फटक्यावर चांगलेच दमवले. प्रणॉयने पहिला गेम 21-18 असा जिंकला पण त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नाराओकाकडून त्याला विशेष प्रतिकार होऊ शकला नाही. आता या स्पर्धेत डेन्मार्कचा टॉप सिडेड व्हिक्टर अॅक्सेलसन आणि चीन तैपेईचा तियेन चोयु यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर प्रणॉयचा उपांत्य फेरीचा सामना होईल. पुरुष एकेरीच्या अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या लि फेंगने किदाम्बी श्रीकांतवर 21-14, 14-21, 21-12 अशा गेम्समध्ये मात करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. हा सामना 70 मिनिटे चालला होता.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या टॉप सिडेड फजर अल्फियान आणि मोहमद रियान आर्दियांतो यांचा 21-13, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 41 मिनिटात फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. कोरियाची जोडी मीन केंग आणि सेयुंग सिओ व इंडोनेशियाची जोडी कॅमेंडो आणि डॅनियल मार्टिन यांच्यातील विजयी जोडीबरोबर सात्विकसाईराज आणि चिराग यांचा उपांत्य फेरीचा सामना होईल.









