अंतिम लढतीत चीनच्या वेंग होंग यांगकडून पराभूत : महिला एकेरीत अमेरिकेची बेविन झांग अजिंक्य
वृत्तसंस्था/ सिडनी
रविवारी ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या एचएस प्रणॉयला पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर असलेल्या चीनच्या वेंग प्रणॉयला 9-21, 23-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, या पराभवामुळे प्रणॉयला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच यंदाच्या वर्षातील दुसरी बीडब्ल्यूएफ 500 स्पर्धा जिंकण्याची त्याची संधी हुकली.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत धडाक्यात सुरुवात करत प्रणॉयने अंतिम फेरी गाठली होती. अलीकडेच झालेल्या मलेशियन मास्टर्स स्पर्धेत प्रणॉयने चीनच्या वेंग यांगला नमवले होते. यामुळे या अंतिम फेरीतही तो बाजी मारेल अशी चाहत्यांना आशा होती. अंतिम फेरीतही प्रणॉयने जबरदस्त खेळ साकारला पण त्याला विजयापर्यंत पोहोचता आले नाही. चीनच्या वेंगने सामन्यात आक्रमक खेळताना पहिला गेम 21-9 असा सहज जिंकला. त्याच्या जबरदस्त फटक्यासमोर प्रणॉयची मात्र काही चालली नाही. दुसऱ्या गेममध्ये मात्र प्रणॉयने पुनरागमन करत हा गे 23-21 असा जिंकला. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंत एकेका गुणासाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. तिसऱ्या व निर्णायक गेममध्येही दोघांत चांगलीच चुरस पहायला मिळाली. एकवेळ सामन्यात 18-18, 19-19 व 20-20 अशी बरोबरी होती. पण, मोक्याच्या क्षणी चीनच्या वेंगने सलग दोन गुणाची कमाई करत हा गेम 22-20 असा जिंकला व स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या विजयासह त्याने मलेशियन मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाचा हिशोबही चुकता केला.
महिला एकेरीत अमेरिकेची बेविन झांग अजिंक्य
महिला एकेरीची अंतिम लढत अमेरिकेची बेविन झांग व दक्षिण कोरियाच्या गा किम यांच्यात झाली. 69 मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात बेविनने बाजी मारताना गा किमला 22-20, 21-16, 21-8 असे पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर बेविनने दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये शानदार कामगिरी साकारत जेतेपदाला गवसणी घातली.









