पीव्ही सिंधूची पराभवाची मालिका कायम : किदाम्बी श्रीकांतही पराभूत
वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत यांनी शानदार विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत मात्र अव्वल खेळाडू पीव्ही सिंधूची पराभवाची मालिका या स्पर्धेतही कायम राहिली. किदाम्बी श्रीकांतलाही पराभवाचा सामना करावा लागला.
शुक्रवारी पुरुष गटातील एकेरीच्या सामन्यात एचएस प्रणॉयने आपला विजयी घोडदौड कायम ठेवताना सेमीफायनल गाठली आहे. 9 व्या मानांकित प्रणॉयने इंडोनेशियाचा अव्वल खेळाडू व 17 व्या मानांकित अँथनी गिंटिगला 16-21, 21-17, 21-14 असे पराभूत केले. 73 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने सुरेख खेळ साकारला. सुरुवातीला प्रणॉयने पहिला गेम 21-16 असा गमावला. पण दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन करत त्याने हा गेम 21-17 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर तिसरा व निर्णायक गेम 21-14 असा जिंकत प्रणॉयने शानदार विजय मिळवला. विशेष म्हणजे, पहिला गेम गमावल्यानंतर उर्वरित दोन्ही गेम्समध्ये श्रीकांतने प्रतिस्पर्धी अँथनीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, उपांत्य फेरीत त्याचा सामना मायदेशी सहकारी प्रियांशू राजावतशी होईल.
अन्य एका लढतीत प्रियांशू राजावतने आपलाच मायदेशी सहकारी किदाम्बी श्रीकांतचा 21-13, 21-8 असा एकतर्फी धुव्वा उडवला. या सामन्यात श्रीकांतकडून अनेक चुका झाल्या, याचा फायदा राजावतने घेत उपांत्य फेरीत धडक मारली.
सिंधू पुन्हा पराभूत
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या 12 व्या मानांकित बेविन झांगने सिंधूला 21-12, 21-17 असा पराभवाचा धक्का दिला. 39 मिनिटे चाललेल्या या लढतीत झांगने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना सिंधूला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. मागील काही महिन्यापासून अपयशाचा सामना करावा लागलेल्या सिंधूला अलीकडे एकाही स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. इंडोनेशियन ओपन, कोरियन ओपन, जपान ओपन स्पर्धेतही तिची पाटी कोरीच राहिली आहे. आता, ती डेन्मार्क, कोपनहेगन येथे 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार आहे. याशिवाय, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत याआधीच भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.









