वृत्तसंस्था/ चांगझोयू, चीन
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेला भारताचा बॅडमिंनटपटू एचएस प्रणॉयला येथे सुरू झालेल्या चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. मलेशिया एन्ग त्झे याँगने त्याचा पराभव केला. तसेच लक्ष्य सेनचे आव्हानही पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या प्रणॉयला तीन गेम्सच्या झुंजीत 22 व्या मानांकित याँगकडून 12-21, 21-13, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रकुलचा विद्यमान चॅम्पियन लक्ष्य सेनलाही पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्याला डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनने 21-23, 21-16, 9-21 असे हरवित दुसरी फेरी गाठली. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. याशिवाय प्रियांशू राजावतही पहिल्या फेरीत पराभूत झाला. इंडोनेशियाच्या शेसार हिरेन ऱ्हुस्ताव्हिटोने त्याला 21-13, 26-24 असे हरविले. दुसरा गेम मात्र अत्यंत चुरशीचा झाला. या तिघांच्या पराभवामुळे पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
महिला दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनाही अग्रमानांकित चीनच्या चेन किंग चेन व जिया यि फान यांनी 21-18, 21-11 असे हरवित दुसरी फेरी गाठली. पीव्ही सिंधूने आशियाई क्रीडा स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने महिला एकेरीत भारताचा एकही प्रतिनिधी नाही.









