जपान ओपन बॅडमिंटन : किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का, महिला दुहेरीतही भारताचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था /टोकियो
येथे सुरु असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन तसेच पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांनी शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. किदाम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. गुरुवारी झालेल्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानी असलेल्या लक्ष्य सेनने जपानच्या 17 व्या मानांकित केंटा सुनायामाचा 21-14, 21-16 असा पराभव केला. 50 मिनिटे चाललेल्या या सामन्यात उभय खेळाडूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात कॅनडा ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या लक्ष्यने नेटजवळ सरस खेळ साकारत प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करण्यास भाग पाडले. आता, उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना जपानच्या 33 व्या मानांकित कोको वाटांबेशी होईल. दरम्यान, पुरुष एकेरीतील अन्य एका सामन्यात प्रणॉयने विजयी आगेकूच कायम राखताना आपला मायदेशी सहकारी किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का दिला. त्याने श्रीकांतवर 19-21, 21-9, 21-9 असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत मात्र प्रणॉयसमोर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू व ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेनशी होईल.
सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत
कोरिया ओपन चॅम्पियन असलेल्या सात्विक-चिराग या भारतीय जोडीने आपला विजयी धडाका कायम ठेवताना अंतिम आठ मध्ये स्थान मिळवले आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्यात सात्विक-चिराग जोडीने डेन्मार्कच्या मोल्डे-जेप्पी बे या जोडीचा 21-17, 21-11 असा पराभव केला. यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या भारतीय जोडीने या लढतीत शानदार खेळ साकारला. आता, उपांत्यपूर्व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्विक-चिराग यांचा सामना तैवानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन ली यांग-वांग ची लीन या जोडीशी होईल. महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या त्रिशा जोली व गायत्री गोपीचंद जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जोडीला प्रतिस्पर्धी जपानच्या जोडीने 23-21, 21-19 असे पराभूत करीत आगेकूच केली.









