तैपेई ओपन बॅडमिंटन : महिला एकेरीत तान्य हेमंतची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ तैपेई सिटी
येथे सुरु असलेल्या तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू एचएस प्रणॉय, पारुपल्ली कश्यप, तान्या हेमंत यांनी शानदार विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत मात्र महिला युवा खेळाडू आकर्षी कश्यपला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, सायना नेहवालने अखेरच्या क्षणी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली.

बुधवारी झालेल्या पुरुषांच्या एकेरीतील लढतीत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या प्रणॉयने तैपेईच्या लिन यिसेनचा 21-11, 21-10 असा अवघ्या 26 मिनिटांत पराभव केला. आता, दुसऱ्या फेरीत प्रणॉयची लढत इंडोनेशियाच्या टॉमी सर्जिटोशी होईल. याशिवाय, पुरुष एकेरीतील दुसऱ्या सामन्यात पारुपल्ली कश्यपने जर्मनीच्या सॅम्युअल हॅसिओचा 21-15, 21-16 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 31 मिनिटे चाललेल्या या सामन्यात कश्यपने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, पुढील फेरीत त्याचा सामना तैपेईच्या सु ली यांगशी होईल.
याशिवाय, राष्ट्रीय चॅम्पियन मंजुनाथ कडव्या संघर्षानंतर तैपेईच्या चोऊ तियानकडून 18-21, 21-14, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. ही लढत 39 मिनिटे चालली.
महिला एकेरीच्या लढतीत भारताची युवा खेळाडू तान्या हेमंतने विजयी प्रारंभ करताना हंगेरीच्या अॅग्नस कोरोसीचा 21-7, 21-17 असा पराभव केला. तान्याने नेटजवळ सुरेख खेळ साकारत प्रतिस्पर्धी अॅग्नसला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, तिची पुढील लढत जागतिक बॅडमिंटनमधील अव्वल खेळाडू तेई तेजु यिंगशी होईल. महिला एकेरीच्या अन्य सामन्यात सायना नेहवाल व आकर्षी कश्यप यांनी दुखापतीमुळे माघार घेतली.









