वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन : लक्ष्य सेनचीही विजयी आगेकूच
वृत्तसंस्था/ कोपनहेगन (डेन्मार्क)
भारतासाठी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मंगळवारचा दिवस संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे लक्ष्य सेन व एच.एस.प्रणॉय या खेळाडूंनी पुरुष एकेरीत आगेकूच केली असताना ऑलिंपिक पदकविजेती पी.व्ही.सिंधूला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील तिचे आव्हान संपुष्टात आले.

मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूला या प्रतिष्ठित स्पर्धेतही अपयशाचा सामना करावा लागला. जपानची दिग्गज खेळाडू नोझोमी ओकुहाराने सिंधूला 21-14, 21-14 असे पराभूत केले. विशेष म्हणजे, पहिल्या गेममध्ये सिंधू एकवेळ 9-0 अशी आघाडीवर होती. पिछाडीवरुन ओकुहाराने जबरदस्त पुनरागमन करताना पहिला गेम 21-14 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्येही ओकुहाराने वर्चस्व गाजवताना सिंधूला चुका करण्यास भाग पाडले. अखेरीस सिंधूला हा सामना गमवावा लागला, याशिवाय या स्पर्धेतूनही बाहेर पडावे लागले. 39 मिनिटे चाललेल्या या सामन्यात ओकुहाराने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले.
प्रणॉय, सेनचा विजयी धडाका कायम
दुसरीकडे, पुरुष एकेरीत प्रणॉय व लक्ष्य सेन यांनी शानदार विजयासह तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या प्रणॉयने इंडोनेशियाच्या चिको वार्दियोचा 21-9, 21-14 असा एकतर्फी धुव्वा उडवला. या सामन्यात प्रणॉयने सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी वार्दियोला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आता, पुढील फेरीत त्याचा सामना सिंगापूरच्या लो किन यूशी होईल. याशिवाय, लक्ष्यनेही कोरियन प्रतिस्पर्ध्याला नमवत तिसरी फेरी गाठली आहे.
महिला दुहेरीत त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी तैवानच्या प्रतिस्पर्धी जोडीचा 21-18, 21-10 असा पराभव करत पुढील फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने कमालीचे प्रदर्शन साकारताना अवघ्या 33 मिनिटांत हा विजय मिळवला.









