वृत्तसंस्था /हांगझाऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात पुरुष एकेरीत भारताच्या एच. एस. प्रणॉयने उपांत्य फेरी गाठली आहे तर महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच 41 वर्षानंतर बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात किमान एक पदक यावेळी निश्चित झाले आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एच. एस. प्रणॉयने मलेशियाच्या ली झी जियाचा 21-16, 21-23, 22-20 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत बॅडमिंटन प्रकारात गेल्या रविवारी भारताने पुरुष सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. प्रणॉयचा हा सामना 78 मिनिटे चालला होता. 1982 साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या प्रकारात कास्यपदक मिळवणारा सय्यद मोदी हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आशियाई स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सिंधूने यापूर्वी 2014 च्या इंचॉन तर त्यानंतर 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत अनुक्रमे कास्य आणि रौप्यपदक मिळवले होते. दरम्यान गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या पाचव्या मानांकित बिंगजिओने सिंधूचा केवळ 47 मिनिटात 21-16, 21-12 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय महिला विजयी
सेपाकटकरॉ या क्रीडा प्रकारात सांघिकमध्ये भारताच्या महिला संघाने चीनचा 2-1 असा पराभव केला तर पुरुषांच्या विभागात भारतीय संघाला थायलंड आणि फिलिपिन्सकडून प्राथमिक गटातील लढतीत हार पत्करावी लागली. थायलंडने भारतीय संघाचा 2-0 तर त्यानंतर फिलिपिन्सने भारताचा 2-0 असा पराभव केला होता. आता या प्रकारात भारतीय पुरुष संघाचा पुढील सामना म्यानमारबरोबर शुक्रवारी होत आहे. महिलांच्या विभागात भारताने यजमान चीनचा 2-1 असा पराभव केला. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात भारताला व्हिएतनामकडून पराभव पत्करावा लागला होता.
भारत उपांत्य फेरीत
कॅनोई आणि कायकिंग या क्रीडा प्रकारात भारताच्या सर्व म्हणजे चारही संघांनी गुरुवारी उपांत्य फेरी गाठली आहे. पुरुषांच्या कॅनोई प्रकारातील लढतीत विशाल केवटने उपांत्य फेरी गाठली. महिलांच्या विभागात भारताच्या शिखा चौहानने 145.83 सेकंदाचा अवधी घेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
ब्रिजमध्ये भारत पिछाडीवर
पुरुषांच्या सांघिक ब्रिज या प्रकारामध्ये भारतीय पुरुष संघाला पिछाडीवर रहावे लागले आहे. गुरुवारी सुरू असलेल्या या प्रकारातील अंतिम लढतीत पहिल्या तीन सत्राअखेर हाँगकाँगने भारतावर 132.10-91 अशी आघाडी मिळवली आहे.
मॅरेथॉनमध्ये मान सिंग, बेलिअप्पाची निराशा
पुरुषांच्या मॅरेथॉन या प्रकारात भारताच्या मान सिंग आणि अप्पाचेंगदा बेलिअप्पा यांनी साफ निराशा केली. मान सिंगला आठव्या तर बेलिअप्पाला 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या प्रकारात चीनच्या जी ही ने सुवर्णपदक तर उत्तर कोरियाच्या हेनने रौप्य तर चीनच्या यांगने कास्यपदक मिळवले.
सॉफ्ट टेनिसमध्ये आव्हान संपुष्टात
सॉफ्ट टेनिस या प्रकारात भारताच्या टेनिसपटूंचे आव्हान मिश्र दुहेरीत संपुष्टात आले. फ गटात भारताच्या अनिकेत पटेल आणि मंगोरा बाबू यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच भारताची आणखी एक जोडी जय मीना आणि तिवारी यांना अ गटात शेवटचे स्थान मिळाले.









