स्टॉकहोममधील रिल्टन कप स्पर्धेत पटकावले जेतेपद
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
भारताच्या एम. प्रनेशने येथे झालेल्या रिल्टन चषक बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. फिडे सर्किटमधील ही पहिली बुद्धिबळ स्पर्धा असून या जेतेपदानंतर प्रनेश भारताचा 79 वा ग्रँडमास्टर बनला आहे.
16 वर्षीय प्रनेशने 2500 एलो रेटिंगची मर्यादा पार करीत ग्रँडमास्टरचा बहुमान प्राप्त केला. रिल्टन कप स्पर्धेआधीच त्याने तीन जीएम नॉर्म पूर्ण केले होते. ग्रँडमास्टरचा मान मिळविण्यासाठी खेळाडूला तीन जीएम नॉर्म मिळवावे लागतात आणि 2500 एलो रेटिंग गुणही प्राप्त करावे लागतात.
या स्पर्धेत 22 वे मानांकन मिळालेल्या प्रनेशने क्लीन स्वीप साधत आठ सामने जिंकले आणि जवळच्या प्रतिस्पर्ध्यावर तब्बल एका गुणाची आघाडी घेतली. स्वीडनचा आयएम कान कुकुक्सारी व जीएम निकिता मेशकोव्ज यांना त्याने मागे टाकले. 8 गुणांसह प्रनेशचे पहिले स्थान पटकावत जेतेपद मिळविले. या स्पर्धेत 29 देशांच्या 136 खेळाडूंनी भाग घेतला होता. भारताचा आर. राजा रित्किवने 6 गुणांसह आठवे स्थान मिळविले.
या जेतेपदामुळे फिडे सर्किटमध्ये आता प्रनेश 6.8 सर्किट गुणासह आघाडीवर आहे. वर्षअखेरपर्यंत या सर्किटमध्ये सर्वाधिक गुण मिळविणारा खेळाडू 2024 कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतो. प्रनेशला माजी बुद्धिबळपटू आरबी रमेश ट्रेनिंग देत आहे. ‘प्रनेश हा अपक्व प्रतिभेचा कठोर मेहनत घेणारा खेळाडू आहे. त्याचे ओपनिंग्स फारसे चांगले नसतात, पण मिडल गेम व एन्डगेमचे त्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे,’ असे रमेश त्याच्याबद्दल बोलताना म्हणाले.
रिल्टन चषक जिंकल्याबद्दल व देशाचा 79 वा ग्रँडमास्टर बनल्याबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनने प्रनेशचे अभिनंदन केले आहे. 19 वर्षीय कौस्तुभ चॅटर्जी हा अलीकडेच झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिपवेळी भारताचा 78 वा ग्रँडमास्टर झाला होता.









