सांगली :
उत्तराखंड येथील डेहराडून येथे सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल शुटींग दुहेरीमध्ये बुधगावच्या प्रणव अरविंद पाटीलने कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिच्याबरोबर कास्यपदक मिळविले. त्याच्या यशाबद्दल सांगली जिल्हयातून अभिनंदन होत आहे.
डेहराडून येथे स्पर्धेत प्रणव पाटीलने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. तो बालेवाडी येथे सराव करतो. बुधगाव ता. मिरज येथील गावचा सुपुत्र असणारा प्रणव याने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हील केले आहे. सध्या तो कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातून शिवाजी विद्यापीठ संघामधून कार्यरत आहे. बुधगाव येथील बांधकाम व्यावसायिक व अभियंते अरविंद पाटील यांचा तो सुपुत्र व भारतीय लष्करातील हुतात्मा लेफ्टनंट कर्नल स्वर्गीय प्रकाश पाटील यांचा तो पुतण्या आहे. यापुर्वी त्याने अनेक स्पर्धातून एअर पिस्टलमध्ये विविध पदके व यश मिळविले आहे.








