चेन्नई / वृत्तसंस्था
बेंगळूरचा टिनेजर प्रणव आनंद रोमानियातील विश्व युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपदरम्यान 2500 एलो रेटिंगचा टप्पा पार केल्यानंतर भारताचा 76 वा ग्रँडमास्टर ठरला. 15 वर्षीय प्रणव आनंदने ग्रँडमास्टर टायटलसाठी आवश्यक असलेले अन्य निकष यापूर्वीच पार केले होते. ग्रँडमास्टर होण्यासाठी बुद्धिबळपटूला 3 ग्रँडमास्टर नॉर्म मिळवावे लागतात आणि लाईव्ह रेटिंग 2500 पार करावे लागते.
प्रणव आनंदने आपला तिसरा व शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म जुलैमध्ये 55 व्या बिएल बुद्धिबळ महोत्सवात प्राप्त केला होता. ती स्पर्धा स्वित्झर्लंडमध्ये संपन्न झाली होती. प्रणव आनंदने यापूर्वी स्पेनच्या पाचव्या मानांकित ग्रँडमास्टर बॉनेली (2619 एलो रेटिंग), फ्रान्सचा मॅक्झिमे लॅगार्डे (2631), सेथूरामन एसपी (2623) यांच्याविरुद्ध विजय संपादन केले असून आर्यन चोप्रा (2610), सर्गियान (2661) यांच्याविरुद्ध बरोबरी मिळवली आहे. प्रणवने जानेवारी 2022 मध्ये सिटेगस ओपन स्पर्धेच्या माध्यमातून पहिला ग्रँडमास्टर नॉर्म तर मार्च 2022 मध्ये राऊंड रॉबिन स्पर्धेदरम्यान दुसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला होता.









