वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तुर्कीतील अॅन्टेलिया येथे घेण्यात आलेल्या एफआयजी अॅपॅरेटस विश्व चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेसाठीच्या पात्र फेरीमध्ये भारताची महिला जिम्नॅस्ट प्रणती नायकने व्हॉल्ट प्रकारामध्ये अंतिम फेरी गाठली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 29 वर्षीय प्रणती नायकने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. व्हॉल्ट पात्र फेरीमध्ये प्रणतीने सरासरी 13.317 गुण नोंदवित तिसरे स्थान मिळविले. या पात्र फेरीमध्ये अमेरिकेची जेला हँगने 13.783 गुणासह पहिले तर अमेरिकेच्या क्लेरी पिसेने 13.584 गुणासह दुसरे स्थान मिळविले. आता अंतिम फेरी शुक्रवारी घेतली जाणार आहे. 2019 साली तसेच 2022 साली झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रणती नायकने व्हॉल्ट प्रकारात कांस्य पदके मिळविली होती.









