तृणमूल काँग्रेसला ठोकला रामराम
वृत्तसंस्था/ कोलकाता
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी हे मागील 4 वर्षांपासून तृणमूल काँग्रेसमध्ये कार्यरत होते. अभिजीत मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी लोकसभा खासदाराला काँग्रेसचे महासचिव आणि पक्षाचे पश्चिम बंगाल प्रभारी अन् जम्मू-काश्मीरमधील आमदार गुलाम अहमद मीर यांनी काँग्रेसचे सदस्यत्व प्रदान केले आहे.
हा माझा काँग्रेस आणि राजकारणातील दुसरा जन्मदिन आहे. मागील वर्षी जून महिन्यात काँग्रेसमध्ये पुन्हा सामील होण्याची इच्छा व्यक्त दिली होती. परंतु विविध राज्यांच्या निवडणुकांमुळे हे आता होऊ शकले असे उद्गार अभिजीत मुखर्जी यांनी काढले आहेत. जुलै 2021 मध्ये अभिजीत यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत हे पुन्हा पक्षात परतल्याने पश्चिम बंगालच्या लेकांसाठी पक्षाच्या लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांनी म्हटले आहे.









