वृत्तसंस्था / अबिया (नायजेरीया)
भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने नुकत्याच येथे झालेल्या पहिल्या अबिया पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवून दर्जेदार कामगिरी केली आहे. प्रमोदने आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन क्षेत्रात आपले निविर्वाद वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. अबियातील ही स्पर्धा 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली होती.
प्रमोद भगतने या स्पर्धेत एसएल-3 पुरूषांच्या एकेरी बॅडमिंटन प्रकारात सुवर्णपदक मिळविताना आपल्याच देशाच्या मंटू कुमारचा 21-7, 9-21, 21-9 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना चुरशीचा झाला. पहिला गेम जिंककल्यानंतर मंटू कुमारने दुसरा गेम जिंकून सामन्याला रंगत आणली. पण तिसऱ्या गेममध्ये प्रमोदने आपल्या अनुभवाच्या जोरावर मंटू कुमारचे आव्हान संपुष्टात आणले.
प्रमोद भगतने या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक पुरूष दुहेरीत पटकाविले. प्रमोद भगत आणि सुकांत कदम या भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंनी अंतिम सामन्यात पेरुच्या ग्रेर्सन लोस्टानॉल आणि डायना गोलॅकचा 21-13, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. प्रमोद भगतने तिसरे सुवर्ण पदक एसएल-3-एसयु-5, मिश्र दुहेरीत पटकाविले. भगत आणि आरती पाटील या भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंनी दर्जेदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या पॅरा बॅडमिंटनपटूंनी समाधानकारक कामगिरी केली आहे. भारताच्या रणजीत सिंगने तीन कांस्यपदके मिळविली. त्याने पुरूषांच्या डब्ल्यूएच-1, एकेरीत तसेच डब्ल्यूएच-1-डब्ल्यूएच-2 पुरूष दुहेरीत परमजित सिंग समवेत, डब्ल्यूएच-1, डब्ल्यटूएच-2 मिश्र दुहेरीत शबाना समवेत रणजीत सिंगने कांस्यपदक मिळविले. नुरूल हसन खानने पुरूष एकेरीत डब्ल्यूएच-2 विभागात रौप्यपदक, उमा सरकारने महिलांच्या एसएल-3 एकेरीत रौप्य पदक तसेच आरती पाटील आणि उमा सरकार यांनी महिला दुहेरी एसएल-3, एसयु-5 गटात कांस्यपदक मिळविले आहे









